महिला व बालविकास खात्यातर्फे गृहआधार योजनेतील नवीन अर्जदारांचे पात्रता पडताळणी सर्वेक्षण येत्या १ डिसेंबर २०१९ पासून प्रारंभ करण्यात येणार आहे.
सरकारकडून गृह आधार योजनेखाली गृहिणींना वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर साहाय्य करण्यासाठी प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जात आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाखांपेक्षा कमी असलेल्या गटातील राज्यातील १ लाख ५२ हजार महिलांना या योजनेखाली आर्थिक साहाय्य केले जात आहे. या योजनेखाली अनेक महिलांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या पडताळणीमुळे अर्जदाराचा सामाजिक आर्थिक स्तर पडताळून त्याची पात्रता निश्चित करण्यात मदत होणार आहे. तसेच योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने नियुक्त केलेल्या सर्वेक्षकांकडून अर्जदारांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षक अर्जदारांच्या घरी भेट देणार आहे. सर्वेक्षक आपले ओळखपत्र अर्जदाराला दाखवेल, त्यानंतर अर्जदाराचे छायाचित्र घेईल.