शमी सातव्या, अगरवाल ११व्या स्थानी

0
130

>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर

भारताच्या बांगलादेशवरील एक डाव व १३० धावांनी विजयात सिंहाचे योगदान दिलेल्या मोहम्मद शमी व मयंक अगरवाल यांनी काल रविवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी मुसंडी मारली आहे. शमीने गोलंदाजांच्या यादीत थेट सातवे स्थान मिळविले असून फलंदाजांमध्ये मयंक अगरवाल याने ११व्या स्थानावर हक्क सांगितला आहे.

इंदूर कसोटीत शमीने २७-३ व ३१-४ अशी कामगिरी केली होती. त्याच्या या भन्नाट गोलंदाजीमुळे बांगलादेशचा पहिला व दुसरा डाव अनुक्रमे १५० व २१३ धावांत संपला होता. तर अगरवालच्या दुसर्‍या कसोटी द्विशतकाच्या (२४३ धावा) भारताला ६ बाद ४९३ धावांवर आपला डाव घोषित करणे शक्य झाले होते.
शमीने आपल्या सात बळींच्या जोरावर आठ स्थानांची सुधारणा करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सातवे स्थान प्राप्त केले. शमी जसप्रीत बुमराहपेक्षा तीन स्थाने खाली व अश्‍विनपेक्षा तीन स्थाने वर आहे. शमीच्या खात्याच ७९० गुण जमा आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजासाठी हे तिसर्‍या क्रमांकाचे सर्वांत जास्त गुण आहेत. कपिलदेव (८७७) व बुमराह (८३२) यांच्यानंतर शमीचा क्रमांक लागतो.
फलंदाजी विभागात अगरवालचा ‘टॉप १०’मधील प्रवेश थोडक्यात हुकला. आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये विराट कोहली (२), चेतेश्‍वर पुजारा (४), अजिंक्य रहाणे (५) व रोहित शर्मा (१०) हे चार भारतीय खेळाडू आहेत. केवळ ८ कसोटींचा अनुभव गाठीशी असलेल्या अगरवालने ७१.५०च्या सरासरीने तीन शतके व ३ अर्धशतकांसह ८५८ धावा केल्या आहेत. आपला शानदार फॉर्म कायम राखल्यास नवव्या कसोटीत ‘हजार’ धावा पूर्ण करण्याची नामी संधी त्याला असेल.

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात बांगलादेशसाठी निराशाजनक ठरली. परंतु, ‘जीवदानांच्या’ जोरावर ४३ व ६४ धावा केलेल्या मुश्फिकुर रहीम याने पाच स्थानांनी वर सरकताना फलंदाजांमध्ये ३०वा क्रमांक मिळविला आहे. बांगलादेशचा सर्वांत प्रभावी गोलंदाज अबू जायेद याने चार बळींच्या जोरावर १८ स्थानांची उडी घेत गोलंदाजांच्या यादीत ६२वा क्रमांक मिळविला आहे.

अन्य भारतीय खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा याने फलंदाजी विभागात संयुक्त ३५वा क्रमांक मिळविला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनदेखील ३५व्या स्थानी आहे. शमीचे साथीदार इशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येकी एका स्थानाची प्रगती करताना २०वा व २२वा क्रमांक मिळविला आहे.