सुवर्णमहोत्सवी ‘सुवर्णमयूर’

0
266
  •  मनस्विनी प्रभुणे-नायक

दोनशेहून अधिक चित्रपटांचा खजिना यावर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेऊन येत आहे. आठ दिवस- दोनशे चित्रपट असा आकडा सतत डोळ्यासमोर फिरतोय. रोज जास्तीत जास्त पाच चित्रपट म्हटले तरी यातले फक्त चाळीसच चित्रपट बघून होतात. खूप दिवसांपासून यादीत असलेला एखादा चित्रपट बघायला गेले की दुसरा एखादा चांगला चित्रपट हुकतोच. यावर्षी तर आकर्षणाचे अनेक बिंदू आहेत. फक्त दोन दिवसांचं अंतर उरलंय, त्या परिचित अंधारात अपरिचित प्रतिमांमध्ये हरवून जायला…

भारतातील चित्रपट महोत्सवांची पंढरी म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडे म्हणजेच ‘इफ्फी’कडे बघितलं जातं. याच पंढरीला येणारे चित्रपट-रसिक मला वारकर्‍यांसारखे वाटतात. फक्त यांच्या खांद्यावर कुठलाही झेंडा नसतो की कपाळावर गधं नसतं. मात्र चित्रपटांचा जयघोष मुखी ऐकू येत असतो. आता इफ्फीचा पडदा उघडण्यासाठी दोन दिवस उरले असताना ही सगळी मंडळी आपल्या दरवर्षीच्या ‘चित्रपटवारी’च्या तयारीला लागली असेल. पुढच्या दोन दिवसांत इफ्फीचा आवार या ‘चित्र-वारकर्‍यांनी’ गजबजून जाईल. प्रत्येकाच्या चर्चेत चित्रपट हाच विषय असेल. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून, आठ दिवस सुट्टी काढून फक्त चित्रपटांच्या प्रेमाखातीर येणार्‍या या तमाम रसिकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं म्हणजेच इफ्फीचं हे पन्नासावं वर्ष आहे आणि इफ्फीला गोव्यात येऊन पंधरा वर्षं झाली, त्यामुळे यंदाचं वर्ष चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तमाम चित्रपट-रसिकांना जे दरवर्षी न चुकता इफ्फीला हजर राहतात, त्यांनादेखील यावर्षीच्या इफ्फीची प्रचंड उत्सुकता आहे. यावर्षी कोणते चित्रपट दाखवले जातील? ‘कंट्री फोकस’ विभागात कोणत्या देशाचं दर्शन घडेल? ‘वर्ल्ड कॉम्पिटिशन’मध्ये कोणत्या चित्रपटांची निवड झाली असेल? ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ विभागात कोणता अभिनेता-अभिनेत्री असतील ज्यांचे निवडले गेलेले उत्तम चित्रपट यात बघायला मिळतील? जसजसा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जवळ येऊ लागलाय तशा चित्रपट-रसिकांच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत आणि इफ्फीच्या वेबसाइटवर पडणार्‍या अपडेट्समुळे अशा चर्चांना छान चालनाच मिळालीय.

इफ्फीला जशी सुरुवात झाली तसे इफ्फी कुठे भरवला गेला पाहिजे यावर मतभेद असायचे. यामुळे गोव्यात येण्यापूर्वी इफ्फी ‘टुरिंग टॉकीज’सारखाच फिरता राहिला. आजवर मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता, त्रिवेंद्रम, बेंगलोर, दिल्ली याठिकाणी इफ्फीचं आयोजन करण्यात आलं. २००४ साली सुषमा स्वराज यांनी इफ्फीला कायमची जागा मिळाली पाहिजे असं मत व्यक्त करून ‘कान’च्या धर्तीवर गोव्यात हा महोत्सव स्थिर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. इफ्फीचे पन्नासावे वर्ष साजरे करत असताना सुषमा स्वराज आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना विसरता येणार नाही. दुर्दैवाने ते दोघेही हा सोहळा बघायला आपल्यात नाहीत. गोव्यात पहिल्यांदा इफ्फीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा अनेकांनी ‘इफ्फी गोव्यात नको’ म्हणून मोठा गलका केला होता. अगदी याबाबत राष्ट्रीय प्रसार माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली होती. तीच मंडळी आता गोव्याला वगळून इफ्फीचा विचार करू शकत नाही, किंबहुना आता गोव्याला इफ्फीच्या आयोजनातून वगळलं तर याच मंडळींना सगळ्यात जास्त गोव्याची आठवण येईल. गोव्याने इफ्फीबरोबरच्या पंधरा वर्षांत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यानिमित्ताने दरवर्षी मुद्दाम गोव्याला यायला मिळतं म्हणून अनेकजण खूश असतात.

इफ्फीचं पन्नासावं वर्ष

पन्नासावं वर्ष साजरं करत असताना इफ्फीच्या आणि चित्रपट-रसिकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. २००४ साली इफ्फीचं आयोजन गोव्यात झालं आणि त्यावर्षापासून इफ्फीशी जोडले गेले. त्यावर्षी इफ्फीचं चौतिसावं वर्ष होतं. या टप्प्यावर मागे वळून बघत असताना आपण तसे या महोत्सवाशी उशिराच जोडले गेलो याची खंत वाटत राहते. १९५२ साली मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. १९४८ साली स्थापन झालेल्या फिल्म डिव्हिजन आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते इफ्फीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. भारतातच नव्हे तर आशियाई खंडात पहिल्यांदाच अशाप्रकारचा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पहिल्या वर्षी तेवीस देशांमधील चाळीस चित्रपट दाखवण्यात आले होते, ज्यात जागतिक पातळीवर नावाजला गेलेल्या इटलीच्या ‘बायसिकल थीव्ह्स’ या चित्रपटाचा समावेश होता. याच महोत्सवात राज कपूरचा ‘आवारा’ दाखवण्यात आला आणि दोन भिन्न देशातली परिस्थिती या चित्रपटांच्या माध्यमातून बघत असताना अनेकांना यात साम्यस्थळं दिसली होती. राज कपूरने हा पहिला चित्रपट महोत्सव गाजवला. पण तिसर्‍या इफ्फीला खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं स्वरूप आलं. तिसर्‍या वर्षी सत्यजित रे महोत्सवाचे अध्यक्ष बनले. याच वर्षी पहिल्यांदा जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील चित्रपटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. शिवाय महोत्सवाच्या रचनेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले ज्यामुळे इफ्फीला पॅरिसच्या ‘फिल्म प्रोड्युसर फेडरेशन’कडून जागतिक पातळीवरील ‘अ’ श्रेणी मिळाली. चित्रपट महोत्सवांचं जागतिक पातळीवर आयोजन करणार्‍या व्हेनिस, मास्को, बर्लिन, कान यांसारख्या ‘अ’ श्रेणीतील देशांच्या पंगतीत भारताची गणना होऊ लागली. आता या बाकीच्या देशांत असणार्‍या पायाभूत सोयीसुविधा, तांत्रिक गोष्टींबाबत आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही ही गोष्ट वेगळी. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर महोत्सवाचं आयोजन आणि वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या देशांचा इफ्फीमध्ये वाढत जाणारा सहभाग याची दखल घ्यावीच लागते.

कंट्री फोकस : रशिया

इफ्फीमध्ये दरवर्षी ‘कंट्री फोकस’ विभागात एकाच देशातील चित्रपट दाखवले जातात. यावर्षी कंट्री फोकसमध्ये रशियाची निवड झाली आहे. आठ रशियन दिग्दर्शकांचे आठ चित्रपट यानिमित्ताने बघायला मिळतील. रशियातील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शक आंद्रे तार्कोव्हस्की यांच्यावरील ‘आंद्रे तार्कोव्हस्की – अ सिनेमा प्रेअर’ या माहितीपटाचं मोठं आकर्षण आहे. रशियन सिनेमा म्हटलं की आंद्रे तार्कोव्हस्की याचं नाव समोर येतं. याशिवाय अलेक्सॅन्डर बोगुस्लावस्की, अलेक्झांडर गोरचिलिन, कांटेमीर बालागोव्ह, लेक्झांडर लंगिन, लॅरिसा सॅडिलोवा, किरील सोकोलोव्ह, कॅरेन ओगनेस्यान या रशियन दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा समावेश आहे. रशियन सिनेमात अनेक स्थित्यंतरे आली. तिथल्या दिग्दर्शकांनी मोठ्या अवघड परिस्थितीत चित्रपटांची निर्मिती केली. अनेक बंधनांची ओझी त्यांना वाहावी लागली. पण या सगळ्यातून झालेली चित्रपटनिर्मिती ही थक्क करणारी आहे. कंट्री फोकस विभाग मी दरवर्षी आवर्जून बघते. चित्रपट एखाद्या पुस्तकासारखे असतात. त्याच्या माध्यमातून त्या देशाला समजून घेता येतं. तिथलं सामाजिक, राजकीय वातावरण, समस्या समजून घेता येतात. यावर्षी रशियन चित्रपटाच्या माध्यमातून रशियाला जाणून घेण्याचा प्रयत्न असेल.

पन्नास दिग्दर्शिका आणि त्यांचे पन्नास चित्रपट

पन्नासावं वर्ष म्हणून यावर्षीच्या महोत्सवात अनेक नव्या विभागाची घोषणा झाली. त्यात सर्वप्रथम आकर्षित केलं ते पन्नास दिग्दर्शिका आणि त्यांच्या पन्नास चित्रपटांनी. दिग्दर्शिकांच्या नजरेतून चित्रपट बघणं हा एक वेगळा अनुभव असतो. त्यांची मांडणी, चित्रपटाच्या माध्यमातून त्या सांगत असलेली गोष्ट समजून घेताना मजा येते. सोफी डेरास्पेचा ‘अँटिगनी’, इराणी दिग्दर्शिका मेहनाज मोहम्मदीचा बहुचर्चित ‘सन अँड मदर’, हिकारी या जपानी दिग्दर्शिकेचा आत्मनिर्भर आयुष्य जगण्याची पराकाष्ठा करणार्‍या स्त्रीवर आधारित ‘३७ सेकंड’, सेलीन सायन्माचा प्रतिभावान चित्रकार मारियानाच्या जीवनावर आधारित ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’, उंजू मूनचा आस्ट्रेलियन-अमेरिकन बॅण्डस्टॅण्ड गायिका हेलन रेडीच्या जीवनावर आधारित ‘आय एम वूमन’, चिनी दिग्दर्शिका ऑलिव्हर स्यू कुएन चान हिचा ‘स्टील वूमन’ हा व्हिलचेअरवर खिळून बसलेला रुग्ण आणि त्याची मदतनीस यांचे भावबंध उलगडून दाखवणारा चित्रपट या विभागात बघायला मिळणार आहे. जगभरातील पन्नास प्रतिभावान दिग्दर्शिकांना आणि त्यांच्या कलाकृतीला बघणं हा या वर्षीच्या महोत्सवातला सगळ्यात आनंददायी अनुभव असेल. फक्त एकच गोष्ट राहून राहून खटकतेय, या पन्नासजणींमध्ये एकही भारतीय दिग्दर्शिका कशी काय नाही? ज्युरींना तशी एकही भारतीय दिग्दर्शिका योग्य वाटली नाही का? जगभरातील पन्नासजणींचा विविधरंगी ‘कोलाज’ बघत असताना अपर्णा सेन, सई परांजपे, मीरा नायर, कल्पना लाझमी, सुमित्रा भावे यांची नक्कीच आठवण येईल.

मास्टर फ्रेम

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या दिग्दर्शकांचे ‘मास्टरपीस’ म्हणता येतील असे चित्रपट यावर्षी ‘मास्टर फ्रेम’ या नव्या विभागात निवडण्यात आले आहेत. यात एकूण सोळा दिग्दर्शकांचे सोळा सर्वोत्तम चित्रपट बघायला मिळणार आहेत. रॉय अँडरसनचा ‘अबाउट एन्डलेस’, कोस्टा गॅव्ह्रस यांचा ‘ऍडल्ट इन द रूम’, सेमीह कप्लानोग्लू यांचा ‘कमिटमेंट’, वर्नर हर्झोग यांचा ‘फॅमिली रोमान्स एल एल सी’, पेड्रो अल्मोडोव्हरद्वा यांचा ‘पेन अँड ग्लोरी’, फातिह आकिनचा ‘द गोल्डन ग्लोव्ह’ या चित्रपटांचा समावेश आहे. यात निवड करताना जुन्या आणि नव्या पिढीतील दिग्दर्शकांना एकत्रित आणून दोन्ही पिढीच्या चित्रपटांची मांडणी समजून घेण्याची संधी यानिमित्ताने मिळतेय.

सोल ऑफ आशिया

इफ्फी हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे जिथे आशिया खंडातील छोट्या-मोठ्या सर्व देशांच्या कलाकृती बघायला मिळतात. पहिल्या इफ्फीपासून आशियातील चित्रपटांचा समावेश होता आणि युरोपीय देशांतून येणार्‍या डेलिगेट्सना आशियाई चित्रपटांचं आकर्षण असायचं. यंदाही चीन, जपान, तैवान, कोरिया, श्रीलंका, सिंगापूर आदी देशांतील चित्रपटांची निवड या विभागात करण्यात आली आहे. नव्या दमाच्या दिग्दर्शकांना यात समाधी देण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून आशियाई खंडातील घडामोडींचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे. ‘टेन इयर्स जपान’ आणि ‘टेन इयर्स तैवान’ ही चित्रपट मालिका आहे जी त्या-त्या देशांतील आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्रण या दोन्ही देशातील युवा दिग्दर्शक कसे करतात यावर आधारित आहे.

बहुचर्चित चित्रपट

वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवलेल्या चित्रपटांना यावर्षी ‘कॅलिडिओस्कोप’मध्ये बघायला मिळेल. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉन्ग जून – हो दिग्दर्शित आणि ‘पाल्म दि ओर’ हा विशेष पुरस्कार प्राप्त असलेला ‘पॅरासाईट’, व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘होरायझन पुरस्कार’ विजेता मेहदी बरसाउई यांचा ‘मुलगा’ हा चित्रपट, लेव्हन अकिन यांचा बहुचर्चित ‘अँड वे डान्स’, कॅन्स ज्युरी पुरस्कार विजेत्या ज्युलियाना डोर्नेलेस आणि क्लेबर मेंडोना फिलहो यांचा ‘बाकुराऊ’, लोकरानो फिल्म फेस्टिव्हल विजेता रोनार रॅनर्सन यांनी दिग्दर्शित केलेला ‘एको’, सिल्वर बर्लिन बिअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजेता अँजेला शॅनेलेक यांचा ‘आय वॉज होम बट’, मीरोस्लाव्ह टेरझिक दिग्दर्शित १० आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्बियन चित्रपट ‘स्टिचेस’, क्रिस्टिना ग्रोझेवा आणि पेटार वाल्चानोव्ह यांचा कार्लोवी व्हेरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजेलला ‘द फादर’ चित्रपट बघण्याची संधी इफ्फीच्या निमित्ताने मिळतेय.

दोनशेहून अधिक चित्रपटांचा खजिना यावर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेऊन येत आहे. आठ दिवस- दोनशे चित्रपट असा आकडा सतत डोळ्यासमोर फिरतोय. रोज जास्तीत जास्त पाच चित्रपट म्हटले तरी यातले फक्त चाळीसच चित्रपट बघून होतात. खूप दिवसांपासून यादीत असलेला एखादा चित्रपट बघायला गेले की दुसरा एखादा चांगला चित्रपट हुकतोच. यावर्षी तर आकर्षणाचे अनेक बिंदू आहेत. फक्त दोन दिवसांचं अंतर उरलंय, त्या परिचित अंधारात अपरिचित प्रतिमांमध्ये हरवून जायला…