नाफ्तावाहू जहाजाची जबाबदारी केंद्रीय मंत्रालयाकडे

0
191

दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या एनयू शी नलिनी या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याची जबाबदारी भारत सरकारच्या डायरेक्टर जनरल शिपिंग या मंत्रालयाने स्वीकारली असून जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याबाबतचा निर्णय डीजी शिपिंग यांच्याकडून घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

अरबी समुद्रातील क्यार या वादळामुळे मुरगाव बंदरातून नलिनी हे नाफ्तावाहू जहाज भरकटत दोनापावल येथे समुद्रात रुतलेले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे.
या रुतलेल्या जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याचे काम मोठे जोखमीचे असल्याने डायरेक्टर जनरल शिपिंग यांना ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. डीजी शिपिंग यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून या कामावर देखरेख ठेवण्याचा पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये मुख्य सचिव, एमपीटीचे अध्यक्ष आणि डीजी शिपिंगच्या तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्य सरकारला या जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यांबाबत प्राप्त झालेली दोन कोटेशन डीजी शिपिंग यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहेत. सिंगापूर येथील कंपनीची नियुक्तीबाबतचा निर्णय डीजी शिपिंग यांच्याकडून घेतला जाणार आहे. नलिनी जहाज पूर्ण सुरक्षित आहे. या जहाजाबाबत कोणतीही भिती बाळगण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नाफ्तावाहू जहाजप्रकरणी श्‍वेतपत्रिका काढा ः खंवटे
दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या नलिनी या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यात पंधरा दिवसात यश प्राप्त झाले नाही. सरकारी यंत्रणेकडून केवळ बैठकांवर बैठका सुरूच आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या जहाज प्रकरणी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत? असा प्रश्‍न उपस्थित करून पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सरकारने नाफ्तावाहू जहाज प्रकरणी श्‍वेतपत्रिका जारी करून सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत काल केली.

दोनापावल येथील समुद्रात रुतलेल्या नाफ्तावाहू जहाजाचा विषय गंभीर स्वरूपाचा आहे. या नाफ्तावाहू जहाजामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. या जहाजातून नाफ्ताची गळती होत असल्याचा आरोप आमदार खंवटे यांनी करून एनआयओ या संस्थेच्या तज्ज्ञांकडून जहाजाची पूर्ण तपासणी करण्याची मागणी केली. कोची बंदरातून हे इंजीन नसलेले नाफ्तावाहू जहाज मुरगाव बंदरात कोणी आणले. या जहाजाचा मालक कोण याबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. या प्रकरणी एमपीटीच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना प्रथम अटक करण्याची गरज आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.