अयोध्याप्रश्‍नी अनावश्यक वक्तव्ये केंद्रीय मंत्र्यांनी करू नयेत

0
153

>> निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांची सूचना

अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालय लवकरच निवाडा देणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही अनावश्यक वक्तव्ये करू नयेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना केली आहे. मोदी यांनी काल या विषयावर आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा केली.

अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात मित्रत्वाचे आणि जातीय सलोख्याचे वातावरण कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी आपल्या मंत्र्यांसमोर स्पष्ट केले. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या दि. १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असून त्याआधी सर्वोच्च न्यायालय अयोध्याप्रश्‍नी निवाडा जाहीर करण्याची शक्यता आहे.

विजयाचा जल्लोष करू नये
सर्वोच्च न्यायालयाच्या या संवेदनशील विषयावरील निवाड्याकडे विजय, पराजय अशा नजरेतून पाहणे योग्य होणार नाही, असे मत पंतप्रधानांनी बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वानेही हा निवाडा आपल्या बाजूने लागल्यास त्याचा जल्लोष करू नये, असे आपल्या प्रचारकांच्या बैठकीत स्पष्ट केले होते.
या अनुषांगाने याआधीच रा. स्व. संघ व भाजप नेते यांनी मुस्लिम नेते व विचारक यांच्याशी बैठकी घेतल्या. त्यात निवाडा कसाही असला तरी जल्लोष केला जाऊ नये यावर भर देण्यात आला. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती.

दरम्यान जमियत उलामा-इ-हिंद या आघाडीच्या मुस्लिम संघटनेने काल सर्वोच्च न्यायालय अयोध्याप्रश्‍नी जो निवाडा देईल त्याचा आदर केला जाईल, असे म्हटले आहे. तसेच मुस्लिमांनी निवाड्याचा सन्मान राखावा, असे आवाहनही या संघटनेने केले आहे. या संघटनेचे नेते अर्शद मदानी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा कायद्याला अनुसरूनच असेल याबद्दल आम्हाला विश्‍वास आहे. प्रत्येक न्यायप्रेमी व्यक्तीला वाटते की, हा निवाडा वस्तुस्थिती आणि पुरावे यावरच आधारीत असेल, असेही मदानी पत्रकार परिषदेत म्हणाले. देशात हिंदू-मुस्लिम एकता सदैव रहावी, असे मत त्यांनी मांडले.