नगरनियोजन खात्याने (टीसीपी) राज्यातील सुमारे १३ लाख २९ हजार चौरस मीटर शेत, बागायती, लागवडीखालील जमिनीचे नगर नियोजन खात्याच्या नवीन १६ ब कलमाखाली सेंटलमेंट विभागात बदलण्याबाबत नोटीस जारी केली आहे.
राज्यातील नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून जमिनीचे झोन बदलण्यासाठी १६ ब कलमाखाली तरतूद करण्यात आली आहे. नगरनियोजन खात्याकडे जमीन मालकांकडून या कलमाखाली जमिनीचे झोन बदलण्यासाठी अर्ज केले जात आहेत.
नगर नियोजन मंडळाच्या १० जून २०१९ रोजी घेण्यात आलेल्या १६५ व्या बैठकीत २९ जमीन मालकांच्या अर्जांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. तर, १० जुलै २०१९ रोजी घेतलेल्या १६६ व्या बैठकीत ५५ जमीन मालकांच्या अर्जांना तत्त्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक ( नियोजन) यांनी एक नोटीस जारी करून जमिनीचे झोन बदलण्याबाबत हरकती किंवा सूचना असल्यास दोन महिन्यात कळविण्याचे आवाहन केले आहे.
जमिनीचे झोन बदलण्यामध्ये तिसवाडी तालुक्यातील ६ लाख ३८ हजार चौरस मीटर शेत, बागायत व इतर प्रकारच्या जमिनीचा समावेश आहे. फोंडा तालुक्यातील २ लाख ५९ हजार चौरस मीटर, सालसेत तालुक्यातील सुमारे १ लाख २० हजार चौरस मीटर, डिचोली तालुक्यातील १ लाख १५ हजार चौरस मीटर, बार्देश तालुक्यातील १ लाख ९ हजार चौरस मीटर, पेडणे तालुक्यातील ६४ हजार चौरस मीटर, केपे तालुक्यातील १६ हजार चौरस मीटर आणि काणकोण तालुक्यातील ५ हजार चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे.