दुसरी वनडे २१ धावांनी जिंकली

0
127

>> न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

न्यूझीलंडने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात इंग्लंडचा २१ धावांनी पराभव करत पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. या विजयासह त्यांनी पाच सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडने विजयासाठी स’ोर ठेवलेल्या १७७ धावाचा पाठलाग करताना इंग्लडचा संघ १९.५ षटकांत १५५ संपला.

नाणेफेक जिंकून इंग्लडने न्यूझीलंडला पथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. मार्टिन गप्टिल व कॉलिन मन्रो यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. गप्टिलने आक्रमक खेळ दाखवताना २८ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची आक्रमक खेळी केली. मधल्या फळीत कॉलिन डी ग्रॅडहोमने १२ चेंडूत २८ धावा कुटल्या. अष्टपैलू जिमी निशमने केवळ २२ चेंडूचा सामना करताना २ चौकार ४ गगनचुंबी षटकारांसह ४२ धावांची स्फोटक खेळी केली. या त्रिकुटाच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने निर्धारित २० षटकंात ८ गडी गमावून १७६ धावा जमवल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन याने ४ षटकात केवळ २३ धावा देत ३ गडी बाद केले. सॅम करन याने २ तर साकीब महमूद, आदिल रशीद व लुईस ग्रेगरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात भयावह झाली. जॉनी बॅअरस्टोव (०) व जेम्स विन्स (१) हे आघाडीचे फलंदाज केवळ हजेरी लावून परतले. डेविड मलान (३९) व कर्णधार ऑईन मॉर्गन (३२) यांनी ३७ धावांची भागीदारी करत संघाचा कोसळता डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, मॉर्गन बाद झाल्यानंतर सॅम बिलिंग्स (८), सॅम करन (९) बाद झाल्याने इंग्लंडचा संघ ५ बाद ९१ असा अडचणीत सापडला. यातच स्थिरावलेला मलान तंबूत परतल्याने १२व्या षटकांत त्याची ६ बाद ९३ अशी केविलवाणी स्थिती झाली. तळाला ख्रिस जॉर्डन याने १९ चेंडूत ३६ धावा चोपत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. परंतु दुसर्‍या टोकाने गडी बाद होत राहिल्याने त्याचे प्रयत्न कमी पडले. न्यूझीलंडकडून डावखुरा फिरकीपटू मिचेल सेंटनर याने २५ धावांत ३ गडी बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. टीम साऊथी याने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. लॉकी फर्ग्युसन तसेच ईश सोधी यानी देखील प्रत्येक २ बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. मालिकेचा तिसरा सामना ५ रोजी नेल्सन येथे खेळविला जाणार आहे.