मडगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राज्यातील बेकायदा खाणी प्रकरणी खटला तांत्रिक आधारावर फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रलंबित बेकायदा खाण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी खाण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका खास समितीची नियुक्ती केली आहे.
न्यायमूर्ती शहा यांच्या बेकायदा खाणींबाबतच्या अहवालानंतर राज्यातील बेकायदा खाणींविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने बेकायदा खाण प्रकरणाच्या तपासणीसाठी गुन्हा अन्वेषण विभागात खास तपासणी विभागाची स्थापना करून बेकायदा खाण प्रकरणांची नोंदणी करून तपासणीला सुरुवात केली. बेकायदा खाण प्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात राजकारणी, सरकारी अधिकारी आणि काही खाण मालकांचा समावेश आहे.
मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बेकायदा खाण प्रकरणी संबंधिताच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. बेकायदा खाण प्रकरणी खटला निर्धारित वेळ मर्यादेच्या बाहेर दाखल करण्यात आल्याचे नमूद करून न्यायालयाने जून २०१९ मध्ये खटला फेटाळला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील बेकायदा खाण प्रलंबित प्रकरणी कारवाईबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर खास समितीकडून बेकायदा खाण प्रकरणाचा आढावा घेतला जाणार आहे. प्रलंबित बेकायदा खाण प्रकरणाच्याविविध खटल्यात काही तांत्रिक त्रृटी, कच्चे दुवे असल्यास दूर करण्यासाठी आवश्यक शिफारस केली जाणार आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून कायदा सचिव, पोलीस महासंचालक, अभियोजन संचालक, खाण संचालक यांचा समावेश करण्यात आला आहे.