- प्राजक्ता प्र. गावकर
(नगरगाव)
‘उघड उघड भिमा दार ग, सातही बंधू आलो गं’ ते असे म्हणता क्षणी भिमा दार उघडणार होती. पण तेवढ्यात तिला दुसरा आवाज ऐकू आला. तो म्हणजे ‘नको उघडू भिमा दार ग, सातही राक्षस खाऊ आले गं’ राक्षस आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले.
एका गावात एक वृद्ध जोडपे राहात होते. त्यांना ओळीने सात मुलगे आणि एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव भीमा होते. घरात ती शेंडेफळ असल्यामुळे सर्वांचीच लाडकी होती. ते जोडपे आता फारच थकले होते. मुलगे कामाला जात व घरात लागेल ते सामान, तेल-तूप आणत. भीमा आता मोठी होत होती. घरातले सर्व कामं शिकून घेत होती. स्वयंपाक जमत होता. तारुण्यात पदार्पण करणार्या भीमाने सर्वांची मने आपल्या चांगल्या स्वभावाने जिंकून घेतली होती.
आणि… एक दिवस सर्व व्यवस्थित असताना भीमाचे आईवडील देवाघरी निघून गेले. सर्व सोपस्कार पूर्ण करून भीमा आपल्या भावांबरोबर राहू लागली. पण त्यांना आईबाबांची खूप आठवण येत होती व एकटेपणा सतावत होता. म्हणून ती सर्व भावंडे रानात आईवडिलांना दहन केलेल्या जागेजवळच घर बांधून राहू लागली.
थोड्या काळाने पावसाळा सुरू झाला. त्या पावसात ज्या ठिकाणी आईवडिलांना दहन केले होते त्या ठिकाणी एक रोप उगवले होते. हळुहळू ते रोप मोठे होऊन त्याचे एका झाडात रुपांतर झाले. ते झाड भीमाच्या घरावर छायेसारखे पडू लागले. ऊनपावसापासून त्यांचे रक्षण करू लागले. या नवीन घरात भीमा एकटीच असायची. सातही बंधू कामासाठी शहरात जात. सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येत.
दिवसभर भीमा दाराला आतून कडी लावून बसत असे. संध्याकाळी भाऊ बाहेर दाराकडे येऊन म्हणत असत, ‘‘उघड उघड भीमा दार गं, सातही बंधू आले गं’’ असे ऐकताक्षणी भीमा दार उघडून भावांना घरात घेत असे.
असे होता होताएक दिवस भीमाचे भाऊ कामासाठी बाहेर गेले असता भीमा चूल पेटवायला काडेपेटी शोधू लागली, तर काडेपेटी संपल्याचे तिला आठवले. आता अग्नी कसा पेटवावा बरे… असा विचार ती करू लागली व हळूच दार उघडून बाहेर येऊन इकडे- तिकडे पाहू लागली… की कुठे एखादे घर दिसते का?
पाहता पाहता तिला दूरवर एक झोपडी दिसली. भीमाने आपल्या घराचे दार ओढून घेतले आणि ती त्या झोपडीच्या दिशेने चालू लागली.
ती झोपडी एका चेटकीणीची होती आणि तिलासुद्धा सात मुलगे होते. भीमा त्या झोपडीजवळ पोचली. खूप चालून आल्यामुळे तिला तहान लागली होती. क्षणभर थांबून तिने कुणी झोपडीत आहे का? याची चाहूल घेतली व दारावर टक टक असा आवाज केला.
दाराचा आवाज ऐकून चेटकीणीने दाराच्या फटीतून बाहेर पाहिले. तिला भीमा दिसली. भीमाला पाहताच तिच्या तोंडाला पाणी सुटले. ती जीभ चाटू लागली. तिचे मुलगेही तिच्याजवळ आले. कोण आहे?… म्हणून विचारू लागले. त्या चेटकीणीने आपल्या सातही मुलांना घरात लपून बसायला सांगितले. त्याप्रमाणे ते राक्षस लपून बसले. नंतर त्या चेटकीणीने एका साध्या बाईचे रूप घेतले व दरवाजा उघडला.
भीमाने त्या बाईला म्हणजे चेटकीणीला नमस्कार केला व आपण कशासाठी आलो ते सांगताना ती म्हणाली, ‘‘स्वयंपाक करण्यासाठी विस्तव पाहिजे होता म्हणून आली. माझ्याजवळची काडेपेटी संपली. भाऊ संध्याकाळी येताना घेऊन येणार. तरी कृपया मला थोडा विस्तव द्याल का?’’
तिचे ते शालीन बोलणे ऐकून ती चेटकीण मनात म्हणाली, ‘‘अगदीच भोळी-भाबडी दिसतेय ही बरी सापडली तावडीत. आता हिची सुटका नाही. मला आणि माझ्या मुलांना ही आयतीच मेजवानी मिळतेय.’’
नंतर ती भीमाला म्हणाली, ‘‘ये बाळ, अशी दारातच उभी का? मी इथे एकटीच राहते. काहीही संशय मनात मुळीच आणू नकोस. माझ्याजवळ काडेपेटीची काडी एकच होती. पण मी सकाळीच चुलीत आग केली असल्यामुळे चुलीत विस्तव आहे पण तू घेणार कशात तो विस्तव?’’तिच्या पदराकडे पाहून चेटकीण म्हणाली, ‘‘थांब हं’’ असे म्हणून चेटकीणीने कोंडा आणला व तो तिच्या पदरामध्ये ओतला व त्या कोंड्यावर विस्तव ओतला व पदराला गाठ मारली. मग भिमा घरी निघाली. घरी पोहोचेपर्यंत चेटकीणीचा हेतू साध्य झाला. पदरामध्ये बांधलेल्या विस्तवाने कोंडा जळून पदराला भोक पडले. व त्यातून कोंडा भिमाच्या घरापर्यंत पडत पडत गेला. आता चेटकीणीने आपल्या मुलांना बोलावून सांगितले की, ‘कोंड्याचा मागोवा घेत चला व भिमाचे भाऊ आल्यानंतर काय होते ते पहा व सांगा.’ त्याप्रमाणे ते गेले. त्यांनी पाहिले. भिमाचे भाऊ आले त्यावेळी ते सातही भाऊ म्हणाले, ‘उघड उघड भिमा दार ग, सातही बंधू आलो ग’ मग भिमाने दार उघडले व भावांना घरात घेतले.
हे सर्व त्या सात राक्षसांनी आपल्या आईला जाऊन सांगितले. त्या चेटकीणीने त्यांना दुसर्या दिवशी दुपारी भिमाच्या घरी पाठवले. ते राक्षस तिथे जाऊन म्हणाले, ‘उघड उघड भिमा दार ग, सातही बंधू आलो गं’ ते असे म्हणता क्षणी भिमा दार उघडणार होती. पण तेवढ्यात तिला दुसरा आवाज ऐकू आला. तो म्हणजे ‘नको उघडू भिमा दार ग, सातही राक्षस खाऊ आले गं’ राक्षस आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. जवळ तर माणूस दिसतच नव्हते. मग बोलले कोण? त्यांनी परत तसेच म्हटले. परत तोच आवाज आला. असे कित्येक वेळा घडले. आता त्यांना घराजवळचे झाड बोलल्याचे समजले. तर खरेच की, त्या झाडातूनच आवाज येत होता.
ते झाड म्हणजे भिमाच्या आई-वडिलांचा प्राण होता. आपल्या मुलीला त्या राक्षसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी ते झाडातून बोलले. भिमाला काहीतरी वाईट घडणार असा संशय आल्यामुळे ती दार न उघडता तशीच बसून राहिली. तिला राहून राहून भाऊ आज लवकर कसे काय आले? असे वाटत होते. शेवटी राक्षसांनी ते झाड तोडले व परत तसेच म्हटले पुन्हा ते झाडाचे ओंडके बोलले व भिमाला दार उघडायला मनाई करू लागले.
त्या राक्षसांनी ते ओंडके जाळले. त्याचे इंगळे झाले. ते सर्व इंगळे बोलू लागले. आता राक्षस आपापसात भांडू लागले. भांडून भांडून मारामारी करुन ते सर्व जण मरून पडले. त्यांची वाट पाहून चेटकीण तिथे आली आणि आपल्या मुलांना मेलेल्या अवस्थेत पाहून आक्रोश करू लागली. नंतर तिने विषारी काटे आणून भिमाच्या दाराच्या उंबर्यावर टाकले व तिथून निघून गेली. तोपर्यंत संध्याकाळ झाली व भिमाचे भाऊ घरी आले व म्हणाले, ‘उघड उघड भिमा दार ग, सातही बंधू आलो ग’ तेव्हा कसलाही आवाज आला नाही. भिमाने भीत भीत दार उघडले. पाहते तो भाऊ आलेत. तिने उंबर्यावर पाय ठेवला मात्र ते विषारी काटे तिच्या पायाला लागले व ती बेशुद्ध पडली. आता भावांना काही सूचेना. आपल्या लाडक्या बहिणीला काय झाले? ते रडू लागले. त्यांचा आवाज तेथूनच जात असलेल्या राजपुत्राने ऐकला व तो त्यांच्याजवळ गेला. त्याने भिमाला पाहिले. तिच्या सौंदर्याने तो मोहित झाला. त्याने तिच्यावर झाडपाल्याचे औषध लावून उपचार केले. नंतर थोड्या वेळाने भिमाने डोळे उघडले. राजपुत्राने भिमाला व तिच्या भावांना आपल्या राज्यात नेले. राजपुत्राने भिमाशी विवाह केला. ते सर्वजण सुखात राहू लागले.