कॉंग्रेस पक्षाचा कायदा विभाग केंद्रीय पर्यावरण व वन मंत्र्यालयाने म्हादई प्रकरणी कर्नाटकाला दिलेल्या पत्राचा अभ्यास करीत आहे. कायदा विभागाच्या शिफारशीनुसार पुढील कृती केली जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
गोवा फॉरवर्डने म्हादई प्रश्नी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात विरोधी पक्षनेते कामत यांनी वरील माहिती दिली. कॉंग्रेस पक्षाच्या कायदा विभागाच्या शिफारशीनंतरच सर्वोच्च न्यायालय किंवा एनजीटीसमोर जाण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही कामत यांनी सांगितले.
गोव्यात जहाजातून नाफ्ता कुणी आणि कशासाठी आणला आहे? याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी सांगितले.
गोव्यातील कुठल्याही कंपनीमध्ये नाफ्ताचा वापर केला जात नाही. तरीही नादुरुस्त नाफ्तावाहू जहाज गोव्यात आणून मोठे संकट निर्माण करण्यात आले आहे. या नाफ्ता प्रकरणी पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणे योग्य होणार नाही, असेही कामत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.