हैदराबादचा गोव्यावर ५ गड्यांनी विजय

0
123

डेहरादून येथे सुरू असलेल्या अंडर २३ क्रिकेट स्पर्धेतील काल गुरुवारी झालेल्या लढतीत गोव्याला हैदराबादकडून ५ गड्यांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. गोव्याने विजयासाठी ठेवलेले २२६ धावांचे माफक आव्हान हैदराबादने लिलया पेलताना ४७.५ षटकांत धावा जमवल्या.

हैदराबादने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर गोवा संघाची ८ बाद ११२ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. नवव्या क्रमांकावर आलेल्या निहाल सुर्लकर याने गोव्याकडून सर्वाधिक १०५ धावा केल्या. त्याने ८३ चेंडू खेळताना ६ चौकार व ६ षटकार मारले. त्याने धीरज यादव (१५) याच्यासह नवव्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने समित मिश्रा (०, २४ चेंडू) याला सोबत घेत शेवटच्या गड्यासाठी ३२ धावा जोडल्या. ४९.२ षटकांत गोव्याचा डाव संपला. हैदराबादकडून राजा मणिप्रसाद याने २५ धावांत ३ गडी बाद केले. विठ्ठल साईराम याने २ तर कार्तिकेय काक, सिद्धांतम राज, चित्ताबोईना यादव व अभिरत मंडादी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. हैदराबादने यानंतर श्रेयस वाला (नाबाद ६८, ११९ चेंडू, ३ चौकार, १ षटकार), विठ्ठल साईराम (नाबाद ६८, ७० चेंडू, ६ चौकार) यांच्या जोरावर सहज विजय मिळविला. गोव्याने १४ अवांतर धावांची खैरात करत हैदराबादच्या विजयाला हातभार लावला.

गोवा संघाकडून धीरज यादव व वेदांत नाईक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. शनिवार २ रोजी गोव्याचा पुढील सामना उत्तराखंडशी होणार आहे.