कदंब सेवा सर्वार्थाने सक्षम हवी

0
203
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

कदंबची सेवा सुधारावी असे जनतेला वाटते. प्रवाशांना आज पावलोपावली खासगी वाहतूकदारांच्या मनमानीला व मुजोरीला सामोरे जावे लागते. अनेकदा ते प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडतात. प्रवाशांशी उद्धटपणे वागतात, कारण त्यांना कोणाचे भय नाही. कदंब डबघाईत यावी म्हणून ते देव पाण्यात घालून बसले आहेत. पण त्यांना सक्षम पर्याय कदंबने द्यावा व जनतेचा दुवा घ्यावा.

निवडणुका असोत वा नसोत, सरकार विविध योजना आणि विकासकामांच्या घोषणा करीत असते. मात्र, निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेली बहुतांश आश्‍वासने बासनात गुंडाळली जातात, तेव्हा नवीन जाहीर केलेल्या योजना कशा कार्यान्वित होणार, हा जनतेला सदैव बुचकळ्यात पाडणारा प्रश्‍न असतो. कारण सरकारकडे अशी कोणतीही जादूची कांडी नसते. तिजोरीतील निधीचा भासणारा ठणठणाट आणि सरकारी बाबूंची कामाप्रतीची उदासीनता यामुळे अनेक आकर्षक योजना बारगळतात आणि हळूहळू जनतेलाही त्यांचा विसर पडतो. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे उलटून गेली, तरी सरकारला जनतेला मूलभूत गरजांसाठी आश्‍वासने द्यावी लागतात हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.

हल्लीच राज्य सरकारने कदंब वाहतुकीमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याबरोबर आधुनिक बसगाड्यांचा समावेश करण्याचे सूतोवाच केले आहे. आधुनिक काळात वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाढती लोकसंख्या, उद्योगधंद्यांमध्ये होणारी वाढ यामुळे सर्व तर्‍हेची वाहने रस्त्यावरून धावू लागली आणि सार्वजनिक वाहतुकीला महत्त्व आल्यामुळे त्यांचे प्रस्थ वाढू लागले. गोव्यात रस्त्यावरील अपघातांत होणार्‍या मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांची संख्या जास्त असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने नोकरी-धंद्यासाठी लांबचा प्रवास करणारे बहुतांश लोक सार्वजनिक बस वाहतुकीचा वापर करतात. गोव्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून खासगी बसवाहतूकवाल्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.

सुमारे ३७ वर्षांपूर्वी दसर्‍याच्या मुहूर्तावर कदंब वाहतूक मंडळाची स्थापना करण्यात आली. गाव तेथे कदंब, रस्ता तेथे कदंब या धोरणानुसार खेड्यापासून शहरांपर्यंत वाहतुकीचा विस्तार करण्याचा निर्धार होता आणि तो सुरुवातीला यशस्वीपणे राबवला गेला. मात्र पुढे भ्रष्ट लोकप्रतिनिधींचे अनुकरण करण्याचे सत्र सरकारी नोकरशहांनी राबवण्यास केली. या सगळ्यांनी जनतेचे हित न पाहता स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल हेच सर्वप्रथम पाहिले. भ्रष्टाचारयुक्त वाळवीने पोखरलेली व्यवस्था म्हणून कदंब वाहतूक मंडळाकडे बोटे रोखली गेली.

कालांतराने कदंबची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात राहिली. पुढे अनेकांनी या मंडळाला सावरण्यासाठी प्रयत्न केले. वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या. परंतु कदंबची गाडी कधी रुळावर आली नाही. कदंब वाहतूक महामंडळ हे सदैव टिंगलीचाच विषय बनले. सुप्रसिद्ध गोमंतकीय कवी आनंद मयेकर यांनी ‘कदंब गाडी’ या शिर्षकाची व्यंगात्मक कविता लिहून कदंब वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था चव्हाट्यावर मांडली होती. ही कविता त्यावेळी गोमंतकीयांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. कदंबच्या या डबघाईस आलेल्या स्वरुपाचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. वास्तविक महामंडळे ही सत्तारूढ पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांची राजकीय सोय लावण्यासाठी अस्तित्वात येतात. यातील अनेक महामंडळे हे सरकारी तिजोरीवर पोसले जाणारे पांढरे हत्ती बनले आहेत. यातील काही महामंडळे तोट्यात असूनही बंद करता येत नाहीत, कारण हजारो कर्मचार्‍यांच्या भविष्याचा प्रश्‍न असतो. त्यामुळे अर्थसंकल्पातून वर्षानुवर्षे या महामंडळांना संजीवनी देण्यासाठी भक्कम अनुदानाची तरतूद करावी लागते. दिवंगत नेते पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी कदंब वाहतुकीची मरगळ झटकण्यासाठी नवीन गाड्या रस्त्यावर आणल्या. मासिक पाससारख्या योजना यशस्वीरित्या राबवल्या. त्याचा अनेकांना फायदा झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तरतूद केली गेली, मात्र कालांतराने यातील गाड्यांचा नियमितपणा खंडित होऊ लागला.
कदंब वाहतुकीची आजपर्यंतची सर्वांत यशस्वी सेवा ही पणजी-मडगाव-वास्को-फोंडा या शहरांतील सुरू असलेली शटल सर्व्हिस सेवा आहे. याचे शुल्क जास्त असले तरी जनतेला सुरक्षित, आवश्यक आणि वेळ वाचवण्यासाठी ही सेवा समाधानकारक अशीच आहे. मात्र अनेक ठिकाणी कदंब वाहतूक ही बेभरवशाची आहे असा अनेक प्रवाशांचा अनुभव आहे. अनेक गाड्या ठराविक वेळी येत नाही. अगदी दुर्गम ठिकाणी कदंब गाड्यांवर निर्भर असलेल्या गावांत या गाड्या ऐनवेळी दांड्या मारतात. त्यामुळे अद्यापही अनेक गावांतील दुर्गम भागांत बस येण्यासाठी १-२ तास वाट पाहावी लागते. तेथील गावकर्‍यांना कित्येक किलोमीटर पायपीट करून प्रवास करावा लागतो. हल्ली कदंब गाड्या रस्त्यात मध्येच बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. कामाचा खोळंबा होतोच, वर तिकिटाचे पैसे परत मिळत नाहीत, कारण पावती फाडलेली असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. अशावेळी खाजगी बसवाले तिकिटाचे पैसे परत देतात अथवा दुसर्‍या बसमध्ये पाठवण्याची सोय करतात. तसेच अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी सुविधाच नसते. अशावेळी गर्दी असताना तारांबळ उडते. कदंब बसस्थानकात लाऊडस्पीकरवरून ‘कर्मचार्‍यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागून कदंबाचे नाव उज्ज्वल करावे’ अशा तर्‍हेच्या घोषणा वारंवार दिल्या जातात. मात्र कार्यालयात चौकशीसाठी फोन केला तर समाधानकारक उत्तर मिळत नाही.

अनेक गावांत शाळकरी विद्यार्थी आणि नोकरीधंद्याला जाणार्‍या मोठ्या वर्गाला कदंब गाडी हे हक्काचे वाहन असे वाटते. मात्र तिथे ही सेवा पोचत नाही किंवा खाजगी बसवाले कदंबची सेवा चालू करण्यास आडकाठी आणतात. कदंबच्या कर्मचार्‍यांना महामंडळाच्या आर्थिक प्रगतीबद्दल कळकळ वाटत नाही. ते नफ्यात कसे येईल याचा विचार न करता आपला व्यक्तिगत स्वार्थ कसा साधता येईल याकडे प्रथम अनेकांचे लक्ष असते. अनेकदा कदंब गाड्या तुरळक प्रवासी घेऊन अथवा प्रवाशांविनाच प्रवास करीत असतात, कारण वाहक प्रवाशांसाठी गाडी थांबवत नाहीत. त्यांना फक्त आपल्या फेर्‍या पूर्ण करण्याची घाई असते. अशा गलथान कारभाराचा फायदा खासगी बसवाले उठवतात. ते आपल्या तिकिटाच्या दरात कपात करून प्रवाशांची संख्या वाढवतात. प्रत्येक बस थांब्यावर गाडी थांबवत प्रवासी जमवतात. खासगी बसवाल्यांची दादागिरी अनेकदा प्रवाशांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरत असली तरी त्यांनी संप जरी पुकारला तर सार्‍या वाहतूक व्यवस्थेचे कंबरडे मोडेल असा अनुभव अनेकदा जनतेने घेतला आहे. ही मुजोरी जिरवण्यासाठी १९८० साली कदंब वाहतूक महामंडळ स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे असे नव्हे की कदंब वाहतूक महामंडळ सर्वार्थाने बेभरवशाचे आहे. अनेक ठिकाणी कदंबची सेवा हा जनतेचा आधार आहे. फक्त त्या सेवेत नियमितता आणि आणि विश्वासार्हता आली पाहिजे. एक कुजका आंबा सगळ्या आंब्यांना नासवतो, तसेच काही कर्मचारी इतरांना बदनाम करीत आहेत. कदंबची सेवा सुधारावी असे जनतेला वाटते. प्रवाशांना आज पावलोपावली खासगी वाहतूकदारांच्या मनमानीला व मुजोरीला सामोरे जावे लागते. अनेकदा ते प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडतात. प्रवाशांशी उद्धटपणे वागतात, कारण त्यांना कोणाचे भय नाही. कदंब डबघाईत यावी म्हणून ते देव पाण्यात घालून बसले आहेत. पण त्यांना सक्षम पर्याय कदंबने द्यावा व जनतेचा दुवा घ्यावा.