‘मरिना’बाबत जनसुनावणी स्थगित ठेवण्याचे आश्‍वासन

0
137

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पाची येत्या २ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित जनसुनावणी राज्याचा किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) तयार होईपर्यंत स्थगित ठेवण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती स्थानिक सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, सांताक्रुझचे आमदार आन्तोनियो फर्नांडिस, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मरिना विषयावरील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी स्थानिक मरिनाविरोधी नागरिकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आमदार आणि स्थानिक मरिना विरोधी नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच मरिना प्रकल्पाला मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती.

मरिना जनसुनावणीचा विषय दिवसेंदिवस तापदायक बनत चालला आहे. स्थानिक मरिना विरोधी नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जनसुनावणी रद्द करण्याबाबत एक निवेदन सोमवारी सकाळी सादर केले आहे.
मरिनाच्या विषयवरील जनसुनावणीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले होते. सोमवारी संध्यकाळी मुख्य्मंत्री डॉ. सावंत यांनी मरिना विरोधी आमदार आणि स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली असून मरिना प्रकल्पाची जनसुनावणी सीझेडएमपी तयार होईपर्यंत स्थगित ठेवण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी दिली.

नावशी गावात मरिना प्रकल्पाला विरोध कायम आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मरिना प्रकल्प गोव्यातून हद्दपार करावा, अशी मागणी आमदार सिल्वेरा यांनी केली. जैवसंवेदनशील विभागात मरिनाला मान्यता दिल्यास पर्यावरणाचा र्‍हास होणार आहे. सीझेडएमपीनंतर मरिना प्रकल्पाबाबत जनसुनावणी घेतल्यास त्या ठिकाणी विरोध केला जाणार आहे, असेही सिल्वेरा यांनी सांगितले.

नावशी येथे मरिना प्रकल्पाला मान्यता देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आमदार फर्नांडिस, आमदार साल्ढाणा, आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले.