दोनापावलमध्ये रुतलेल्या जहाजाला एमपीटी जबाबदार ः मिलिंद नाईक

0
120

दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या जहाज प्रकरणाला एमपीटी व्यवस्थापन जबाबदार आहे. त्या जहाजाचे इंजीन जळल्याने परस्पर विकण्यात आले आहे. रुतलेले जहाज इंजिनाविना केवळ डबा आहे, असा दावा नगरविकास मंत्री तथा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

एमपीटीने सरकारकडून मान्यता न घेता पाकिस्तानमधून आलेले जहाज ठेवण्यात मान्यता दिली. सदर जहाजाचे इंजीन जळले आहे. त्यामुळे त्या जहाजाला कुणीही आसरा दिला नाही. परंतु, एमपीटीने या जहाजाला आसरा दिला, अशी टीका मंत्री नाईक यांनी केली.

पाकिस्तानमधून नाफ्ता घेऊन आलेले जहाज दोन वर्षे देशातील विविध भागात फिरत होते. मागील कित्येक महिन्यापासून मुरगाव बंदरात ठेवून नाफ्ता विक्रीबाबत प्रक्रिया सुरू होती. सदर जहाजातील काही नाफ्ता केरळ येथे उतरविण्यात आला. त्यानंतर जहाज कलकत्ता येथे नेण्यात आले. तथापि, तेथे जहाजातील नाफ्ता स्वीकारण्यात आला नाही. जहाज मुंबईत नेण्यासाठी मान्यता न मिळाल्याने अखेर गोव्यात आणले आहे. जहाजातील नाफ्ता हा मिक्स झालेला आहे. दोनापावल येथे रुतलेल्या जहाजाचा विषय गंभीर आहे. सदर जहाज फुटण्यापूर्वी आवश्यक कारवाई करण्याची गरज आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले