सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात वेगवान घडामोडी

0
129

>> भाजप, सेना नेत्यांकडून स्वतंत्ररित्या राज्यपालांची भेट

काल सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. त्यनतंर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली. दोघेही वेगवेगळ्या वेळी राजभवनात जाणार असल्याने चर्चांना ऊत आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या प्रयत्नांच्या दिशेने आता वेगाने घडामोडी घडू लागल्या असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या भेटी कोणत्याही राजकीय कारणांसाठी नसून आपण राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे फडणवीस आणि रावते यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

अपक्षांचा सेनेला पाठिंबा
जागावाटपानंतर आता भाजप व शिवसेना यांच्यात आकड्यांची शर्यत सुरू झाली आहे. सामर्थ्य दाखवण्यासाठी शिवसेनेने अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. याद्वारेच बच्चू कडू, राजकुमार पटेल, आशिष जयस्वाल व नरेंद्र गोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर, भाजपनेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राष्ट्रवादीला धक्का
दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत नेवासाचे आमदार शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी झालेली भेट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गडाख यांनी पाठिंबा दिल्याने आतापर्यंत शिवसेनेला पाठिंबा देणार्‍या अपक्षांची संख्या पाच झाली असून या अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेना आमदारांची संख्या ६१ झाली आहे.

सेनेला उपमुख्यमंत्रिपद?
शिवसेनेने अडीच वर्षे भाजपचा तर अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला राबवण्याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. मात्र आता शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. नेमके काय होईल हे मंगळवारी संध्याकाळनंतर स्पष्ट होईल मात्र तूर्तास भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री हे सूत्र ठरण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र शिवसेनेने भाजपला ५०:५० या ठरलेल्या फॉर्म्यल्याची आठवण करून दिली. अशातच आता भाजपकडे मुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रिपद असे सत्तेचे सूत्र ठरल्याची माहिती भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी, बी प्लॅन तयार केला असून त्याद्वारे शिवसेनेच्या ज्या आमदारांना मंत्रिपद मिळू शकणार नाही अशा १५ आमदारांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे मातोश्रीवर काल झालेल्या शिवसेनेच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली.