केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र

0
105

>> ‘ते’ मंजुरीपत्र मागे घेण्याची केली विनंती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना एक पत्र पाठवून कर्नाटकाला कळसा भांडुरा पाणी प्रकल्पासाठी म्हादईचे पाणी वळविण्याबाबत दिलेले पर्यावरणीय मंजुरीचे पत्र मागे घेण्याची विनंती काल केली.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला म्हादईचे पाणी वळविण्यासाठी मंजुरी दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी म्हादईचा विषयावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून कर्नाटकला दिलेले पर्यावरणीय मंजुरीचे पत्र मागे घेण्याची विनंती करण्यात येईल, अशी घोषणा गुरूवारी केली होती.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांना पाठविलेल्या पत्रात दहा मुद्यांचा उल्लेख केला आहे. केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी आपल्या मंत्रालयाचे एक पथक कळसा भांडुरा येथे पाठवून तेथील सद्यपरिस्थितीची पाहणी करण्याची विनंती केली आहे. म्हादई लवादाच्या आदेशाला डावलून कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी मलप्रभेमध्ये वळविण्यास सुरुवात केली आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
म्हादई नदीवरील कुठल्याही प्रकल्पाबाबत पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी कुठल्याही प्रकारची मान्यता देऊ नये, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. म्हादई लवादाच्या निवाड्याला दोन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कर्नाटकचा सदर प्रकल्प हा पिण्याचा पाण्यासाठी नाही. तर, सदर प्रकल्प हा जलसिंचन पाणी प्रकल्प असल्याचे गोवा सरकारने पुराव्यासह सिद्ध करून दाखविलेले आहे, असेही पत्रात म्हटले आहे.