– सुनेत्रा कळंगुटकर
अशी ही दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव असलेली साधीसंपन्न दिवाळी. मिणमिणणार्या मातीच्या पणतीसारखी भवतालचा आदिम तम उजळवणारी, मनाचा तळ प्रकाशमय करणारी दिवाळी…
पावसाळा संपून शरदऋतूचा प्रारंभ होतो. अधूनमधून वळवाचा पाऊस, विजांच्या लखलखाटात ढोल ताशे वाजवत सृष्टीचा निरोप घेत असतो. कृष्णमेघांनी व्यापलेले नभोमंडल हळूहळू निवळू लागते आणि आभाळात चंद्राचे दर्शन होऊ लागते. कोजागिरीचा चंद्र चांदण्याची उधळण धरेवर करतो. मनामनांवर चांदण्याची मोहिनी पडते. आभाळातील चंद्राचे सौंदर्य अनुभवतानाच दिवाळी येते आणि धरतीवर लक्ष दिव्यांचा दीपोत्सव साजरा होतो.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव! प्रकाशाचा, चैतन्याचा, आनंदाचा उत्सव! लहानपणी दिवाळीला आताच्यासारखा लखलखाट, झगमगाट नसायचा. नरकासूरांच्या स्पर्धा नसायच्या. आकाशदिवा, पणत्या, फराळ, नवीन कपडे हेच दिवाळीचं आकर्षण असायचं. सगळं वातावरण प्रसन्न असायचं. दसरा झाला की दिवाळीचे वेध लागायचे. हळूहळू दिवाळीची तयारी सुरू व्हायची. दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही मुलं कारीटं गोळा करायचो. पावसाळ्यात परसात उगवून आलेली कारीटाची वेल आता चांगली फोफावलेली असायची. तिला लागलेली हिरवीगार कारीटं आता मोठी झालेली असायची. ही गोल, लंबगोल कारीटं गोळा करून आम्ही आणत असू. झेंडूची फुलं, आंब्याची पानं आणि कारीटं गुंफून सुंदर माळ तयार केली जायची. झाडूनपुसून स्वच्छ केलेल्या न्हाणीघरात घासूनपुसून लखलखीत केलेला, आंघोळीसाठी पाण्याने भरलेला तांब्याचा मोट्ठा हंडा असायचा. त्या हंड्यावर चुन्याने नक्षी, स्वस्तिक असं काढलं जायचं. झेंडू, कारीटाची माळ हंड्याच्या गळ्यात बांधली जायची. चुलीत विस्तव करून हंड्यातील पाणी तापवलं जायचं. न्हाणीघरात नवीन साबण आणि उटणं ठेवलं जायचं. नरकासूराचा वध करून कृष्ण पहाटे येतो तेव्हा त्याला अभ्यंगस्नान करण्यासाठी सगळी जय्यत तयारी ठेवली जायची. पहाटे आम्ही उठायचो तेव्हा कृष्ण आम्हाला नकळत स्नान करून गेलेला असायचा…
आम्हाला उत्तररात्री कधीतरी नरकासूर पाहण्यासाठी उठवलं जायचं. आमच्या डोळ्यांवर झोप असे. तरीही पेंगुळलेल्या डोळ्यांनी आम्ही पाहत असू… सगळ्या दिशांतून अंधार भरून राहिलेला असे. दारातून नरकासूराची मिरवणूक वाजतगाजत जात असे. तो अक्राळविक्राळ, भयंकर दिसणारा नरकासूर पाहून मन भयचकित होत असे. त्या काळोखात त्याचं भयानक रूप मनावर विलक्षण परिणाम करीत असे. नरकासूर पुढं गेल्यावर त्याचं कृष्णाकडं युद्ध होत असे आणि कृष्ण त्याचा वध करीत असे. मग नरकासूराला जाळला जात असे.
प्रागज्योतिषपुरचा राजा नरकासूराने सोळा हजार राजकन्या आणि काही राजांनांही बंदिवासात ठेवलेलं होतं. इंद्रानं श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि श्रीकृष्णानं नरकासूराशी युद्ध करून त्याला ठार मारलं. कृष्णानं नरकासूराच्या बंदिवासातील त्या सोळा हजार राजकन्या आणि राजांना मुक्त केलं. नरकासूराच्या अत्याचारी राजवटीचा अंत होऊन सगळीकडं आनंदाचा प्रकाश पसरला. नरकासूराचा वध करून कृष्ण सूर्योदय होण्यापूर्वी परत आला. नगरामध्ये दीपोत्सव साजरा केला गेला. नरकासूराच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या त्या सोळा हजार राजकन्यांच्या आयुष्यातील काळोखी रात्र सरून प्रकाशपहाट झालेली होती. त्या राजकन्यांनी जीवनातील नव्या पहाटेचं स्वागत केलेलं असेल. त्यांच्या मनातला निराशेचा अंध:कार दूर होऊन मनात आशेचे दीप उजळले असतील… त्यांनीही आपल्या मनात आशेची, स्वप्नांची एक पणती लावलेली असेल… स्वत:भोवतीचा अंधार दूर करणारी पणती…
घरांघरांतून पणत्या लावलेल्या असतात. मिणमिणत्या पणत्यांच्या उजेडानं भोवतालचा अंधार वितळू लागतो. आदिम, गूढ अंधार आपल्या इवल्याशा अस्तित्त्वाने दूर करणार्या पणत्या सगळ्या घरांच्या दारात, व्हरांड्यावर लावलेल्या दिसतात. जणू काळोखाच्या कॅनव्हासवर रेखाटलेल्या दीपमाला. ते दृश्य विलोभनीय असायचे. वडील, भाऊ यांनी बांबूचा सांगाडा वापरून सुंदर रंगीत आकाशदिवा तयार केलेला असायचा. त्या आकाशदिव्यावर प्राणी, पक्षी, फुलं यांची चित्रं असायची. आकाशदिवा अंधाराला प्रकाशाचे दान देत असे. मिणमिणत्या पणत्या आणि आकाशदिवा सभोवतालचा सगळा अंधार उजळून टाकायचे…
पणत्यांनी सगळं घर प्रकाशमान व्हायचं. घरात चैतन्याचं वारं वाहू लागायचं. अभ्यंगस्नानाची तयारी केली जायची. स्नान करून तुळशीपुढं कारीट फोडलं जायचं आणि त्याचा कडू रस जिभेला लावला जायचा. सगळं कडू गिळून टाकून नव्या उत्साहानं जगायचं. दारात सुंदर रांगोळ्या घातल्या जायच्या. आई आम्हा सर्वांना ओवाळत असे आणि मग वडिलांनी दिलेले पैसे आम्ही तिच्या ओवाळणीच्या ताटात घालत असू. आईनं बनवलेला स्वादिष्ट फराळ आनंदानं खात असू.
दिवाळीनंतर लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज… सगळे चैतन्याने भारलेले दिवस! लक्ष्मीपूजनाला दारात समई ठेवून लक्ष्मीचं स्वागत केलं जायचं. बलिप्रतिपदेला गुरांची पूजा केली जायची. अंगणात धेंडला घातला जायचा. शेणाचा गोठा करून, कारीटाची गुरं बनवली जायची. त्यांना राखण्यासाठी गुराख्याची लाकडी मूर्ती ठेवली जायची. भाऊबीजही आनंदानं साजरी केली जायची.
अशी ही दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव असलेली साधीसंपन्न दिवाळी. मिणमिणणार्या मातीच्या पणतीसारखी भवतालचा आदिम तम उजळवणारी, मनाचा तळ प्रकाशमय करणारी दिवाळी…