कीर्तिकेश गडेकरने अंतिम क्षणात इंज्युरी वेळेत नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर धेंपो स्पोर्ट्स क्लबने साळगावकर फुटबॉल क्लबचा ३-२ अशा गोलफरकाने पराभव करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल शानदार विजय नोंदविला.
धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात देवेंद्र मुरगावकरने साळगावकर एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. तर पहिल्या सत्राच्या इंज्युरी वेळेत सॅनसन परेराने घेतलेल्या कॉर्नर किकवर चैतन कोमरपंतने हेडरद्वारे धेंपोच्या गोलरक्षकाला चकवित साळगावकरची आघाडी २-० अशी केली.
दोन गोलांच्या पिछाडीनंतर धेंपो स्पोर्ट्स क्लबने दमदार उभारी मारताना दुसर्या सत्रात तीन गोल नोंदवित सामना ३-२ असा जिंकला. राखीव खेळाडू पेदू्र गोन्साल्वीसकडून मिळालेल्या पासवर ज्योकिम आब्रांचीसने धेंपोची पिछाडी १-२ अशी भरून काढली.
तर पेद्रूने धेंपोला २-२ अशा बरोबरीवर नेले. अखेर सामन्याच्या अंतिम क्षणात कीर्तिकेश गडेकरने धेंपोला पूर्ण गुण मिळवून देणारा महत्त्वपूर्ण गोल नोंदविला.