भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कालपासून ज्येष्ठ क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यासारख्या एका जुन्या जाणत्या खेळाडूकडे या प्रतिष्ठित मंडळाची सूत्रे जाणे ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. विशेषतः बीसीसीआयमध्ये चाललेल्या अंदाधुंदीच्या व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला त्यावर प्रशासकीय समिती नेमावी लागल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या प्रतिष्ठित मंडळाचे गाडे रुळावर आणण्याच्या दिशेने हे एक पाऊल ठरू शकते. अर्थात, एखादा उत्तम खेळाडू हा तेवढाच उत्तम प्रशासक असतोच असे नाही, परंतु किमान क्रिकेट हा श्वास असलेल्या एका व्यक्तीकडे बीसीसीआयची सूत्रे आली आहेत आणि तो जे काही करेल ते भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठीच असेल अशी आशा तरी या नेमणुकीने जागली आहे. न्या. राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात बीसीसीआयने चालढकल केली आणि त्यातून न्यायपालिकेशी झडलेल्या संघर्षात अनुराग ठाकूर आणि अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केली, तेव्हापासून बीसीसीआयच्या ‘स्वच्छते’मध्ये न्यायालयालाच लक्ष घालावे लागले होते. लोढा समितीच्या शिफारशींना सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात रूपांतरित केेले तरीही बीसीसीआय नाना बहाणे पुढे करून त्या शिफारशींच्या अंमलबजावणीला तयार नव्हते, त्यामुळे अखेर न्यायालयाला मंडळाला जबर दणका द्यावा लागला होता. गांगुली यांच्या सध्याच्या निवडीमागे अनुराग ठाकूर आणि कंपूच आहे, त्यामुळे त्यांची पुढील कामगिरी कोणत्या दिशेने होते हे पाहावे लागणार आहे. अनेक आव्हाने गांगुली यांच्यापुढे आ वासून उभी आहेत. सर्वांत पहिले आव्हान आहे ते बीसीसीआयची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याचे. गुरुनाथ मेयप्पन आणि एन. श्रीनिवास प्रकरणापासून ती जी उतरणीला लागली ती लागलीच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेमधील बीसीसीआयची पतही खालावली आहे. आयसीसीची सूत्रे शशांक मनोहर यांच्याकडे असली तरीही बीसीसीआयच्या पायांत खोडा घालण्याचेच काम चालत आले. त्यामुळे गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी संबंध आधी सुरळीत करावे लागतील. आयसीसीने बीसीसीआयला मिळणार्या महसुलामध्ये कपात करण्याची व्यवस्था करून टाकली आहे. प्रशासकीय सुधारांसाठी नियुक्त कार्यगटातूनही बीसीसीआयला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे आधी बीसीसीआय आणि आयसीसी यांचे नाते सुधारल्याखेरीज गांगुली यांना तरणोपाय नाही. गांगुला यांच्याकडून भारतीय क्रिकेटरसिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. अलीकडे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील जनतेचा रस हळूहळू कमी कमी होत चालला आहे. क्रिकेट कसोटी सामन्यांना आजकाल प्रेक्षक येत नाही अशी स्थिती आहे. हजार – दीड हजाराच्या जेमतेम उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कसोटी सामने उरकावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी गांगुली यांना झटावे लागेल. मध्यंतरी वर आलेल्या ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ कलमामुळे जुने जाणते खेळाडू बीसीसीआयपासून दूर गेले. बीसीसीआयच्या सल्लागार मंडळात समावेश झाला तेव्हा स्वतः गांगुलीलाही या कलमाची झळ बसली होतीच. त्यामुळे जुन्या जाणत्या खेळाडूंना पुन्हा बीसीसीआयच्या जवळ आणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवणे, एक चांगली निवड समिती घडविणे व त्यातून उभरत्या दमदार खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघासाठी निवड करणे हे एक मोठे आव्हान गांगुली यांच्यापुढे असेल. त्यासाठी विद्यमान नियमांमध्ये काही बदल गरजेचे आहेत, ते कसे करता येईल त्यावर त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आयकर सवलत मिळवण्यासारख्या तांत्रिक गोष्टीही त्यांना कराव्या लागणार आहेत. भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीशी आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खेळाडूंशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करतानाच जुन्या खेळाडूंनाही जवळ आणण्याचे काम त्यांनी करणे अपेक्षित आहे. जे काही निर्णय घ्यायचे ते स्वतंत्र प्रज्ञेने घ्यायचे आहेत याचे भानही गांगुली यांना ठेवावे लागेल. मुळात त्यांच्या निवडीमागे जे घटक सक्रिय होते, ते पाहिले तर हे त्यांना कितपत जमेल याबाबत साशंकता आहेच. गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा, माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू अर्जुन धुमल ही मंडळीच गांगुलींच्या समवेत राहणार आहे. त्यामुळे राजकीय पाठराखणीचा लाभ त्यांना जसा मिळेल तशीच राजकीय हस्तक्षेपाची भीतीही राहील. त्यामुळे आपले निर्णयस्वातंत्र्य अबाधित राखून भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी आपल्याला वावरायचे आहे याची जाणीव त्यांना जागी ठेवावी लागेल. ते गेली पाच वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशचे अध्यक्ष व प्रशासक होते. नियमानुसार दोन कार्यकाळांदरम्यान विश्रांतीकाल सक्तीचा असल्याने जुलै २०२० पर्यंतचा काळ म्हणजे जेमतेम दहा महिनेच त्यांच्या हाती उरलेले आहेत. या दहा महिन्यांत भारतीय क्रिकेटच्या हितरक्षणार्थ त्यांना वावरायचे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचीच नव्हे, तर भारतीय क्रिकेटची प्रतिष्ठा उंचावायची आहे!