महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांसाठी आज मतदान होणार असून दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी भाजप व त्यांचे मित्रपक्ष सत्ता पुन्हा ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर विद्यमान सत्ताधार्यांमधील बंडाळ्यांचा लाभ उठविण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्षांचे डावपेच असल्याचे चित्र आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी दि. २४ रोजी होणार आहे. दरम्यान या राज्यांबरोबरच अन्य १८ राज्यांमध्ये ५१ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही आज होणार आहेत.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना या बड्या पक्षांसह अन्य छोट्या पक्षांची मिळून महायुती सत्तेवर पुन्हा येण्याच्या प्रयत्नात आहे. तर कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या नेतृत्वाखाली अन्य छोटे पक्ष मिळून महाआघाडी नशिब अजमावीत आहे. महाराष्ट्रात सध्या ८,९८,३९,६०० मतदार असून त्यापैकी ४,२८,४३,६३५ महिला मतदार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी एकूण ३२३७ उमेदवार रिंगणात आहेत. ९६६६१ मतदान केंद्रांवर या प्रक्रियेसाठी ६.५ लाख कर्मचारी तैनात आहेत. सकाळी ७ ते संध्या. ६ या वेळेत आज मतदान होणार आहे.
हरयाणात ७५ जागांचे
खट्टर यांचे लक्ष्य
हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर असून ९० पैकी ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हरयाणात एकूण ११६९ उमेदवार रिंगणात आहेत. सध्याच्या विधानसभेत भाजपचे ४८ आमदार आहेत.
या राज्यात भाजपने बबिता फोगट, योगेश्वर दत्त व संदिप सिंग या नामवंत क्रीडापटूंसह टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांना उमेदवारी दिली आहे.