>> मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, ताळगावात व्हायब्रंट गोवा परिषदेचे शानदार उद्घाटन
गोव्यात गुंतवणूक करणार्या गुंतवणुकदारांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित केली जाणार असून गोव्यात गुंतवणूक करणार्या विदेशी गुंतवणूकदारांचे व्यवसाय व व्यापार प्रस्ताव अवघ्या ३० दिवसांत मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित पहिल्या व्हायब्रंट गोवा जागतिक व्यापार शिखर परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना काल दिले.
यावेळी उद्योगमंत्री विश्वजित राणे, माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिङ्गर मोन्सेरात, युएई सरकारच्या परराष्ट्र व्यापार व्यवहार विभागाचे अवर सचिव जुमा मोहम्मद अल कैट, बिझिनेस क्लब ङ्ग्रान्स सरचिटणीस जनरल वेरोनिक मोंकाडा, व्हाईस चेअरमन ओमान चेंबर ऑङ्ग कॉमर्स, ओमान डॉ. सकीलीम अल जुनैदी, उच्च एआरसी एलएलसी, यूएसए जेम्स ली कावस्की, व्हायब्रंट गोवा ङ्गाउंडेशनचे अध्यक्ष नितीन कुंकळ्ळीकर, मुख्य संरक्षक डॉ. जगत शहा, अध्यक्ष राजकुमार कामत, जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज एम. काकुलो, धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो व इतरांची उपस्थिती होती.
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून व्यावसायिक प्रस्तावांच्या मंजुरीसाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. गोव्यात हॉस्पिटालिटी (आतिथ्य), माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि कृषी आधारित उद्योगांना भरपूर संधी असून गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
पर्रीकरांच्या स्वप्नाची पूर्तता
व्हायब्रंट गोवा जागतिक शिखर परिषदेमुळे राज्यातील व्यवसाय आणि गुंतवणुकीला निश्चित चालना मिळणार आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या व्हायब्रंट शिखर परिषद आयोजित करण्याच्या स्वप्नाची पूर्तता केली जात आहे. व्हायब्रंट गोवा परिषद ही पंतप्रधान मोदींच्या न्यू इंडिया चळवळीशी सुसंगत आहे. त्यात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ कार्यक्रम सारख्या घटकांचा समावेश होतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
व्हायब्रंट गोवा सारख्या परिषदांमुळे राज्यात तसेच देशाच्या आर्थिक विकासाला मदत होणार आहे. गोमंतकीय उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि चालना देण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना जुमा मोहम्मद अल कैट यांनी, यूएई भारतात गुंतवणूक करणारा सर्वांत मोठा अरब देश आहे, असे सांगितले.
भारत आणि ओमान या दोन्ही देशांमध्ये मागील ५००० वर्षांपासून व्यावसायिक संबंधांचा इतिहास आहे. ओमानच्या डुकम शहरातील विशेष आर्थिक क्षेत्रात १.८ अब्ज डॉलर्सची भारतीय गुंतवणूक आहे, असे ओमन चेंबर ऑङ्ग कॉमर्सचे उपाध्यक्ष सलीम अल जुनैदी जुनैदी यांनी सांगितले.
राज्यातील युवा वर्गाला रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योग क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे उद्योगमंत्री राणे यांनी सांगितले.
राज्यात नवीन आयटी कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री मोन्सेरात यांनी दिली.
गोव्यात आयटी, पर्यटन, वैद्यकीय आदी विभागात नवीन उद्योग व्यवसायासाठी भरपूर संधी आहेत. व्हायब्रंट गोवा शिखर परिषदेचा स्थानिक युवा होतकरू उद्योजकांना लाभ होणार आहे, असा विश्वास धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी व्यक्त केला.
व्हायब्रंट गोवातर्फे दुसरी व्यापार शिखर परिषद दुबई येथे २०२० मध्ये घेतली जाणार आहे, अशी माहिती राजकुमार कामत यांनी दिली.
५२ देशांतील ५०० प्रतिनिधी उपस्थित
उद्योग व व्यापाराबाबत पाठपुरावा करणार्या विदेशातील वाणिज्य समित्यांशी सामंजस्य करार केले जाणार आहे, अशी माहिती जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो यांनी दिली. या शिखर परिषदेत ५२ देशांतील ५०० विदेशी आणि देशभरातील २ हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहे. ८५ व्याख्याते आणि ४५ बिझनेस पार्टनर सहभागी झाले आहे. उद्घाटन सोहळ्यात व्हायब्रंट गोवा संघ आणि जगभरातील वाणिज्य मंडळे यांच्यात झालेल्या सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यात इंडो-अमेरिकन बिझिनेस कौन्सिल, मलेशियन इंडियन बिझिनेस काउन्सिल, इंडो-कॅनडा बिझिनेस काउन्सिल, कतारची इंडियन बिझिनेस काउन्सिल, नेपाळ चेंबर ऑङ्ग कॉमर्स, बिझनेस क्लब ऑङ्ग ङ्ग्रान्स आणि भूतान चेंबर ऑङ्ग कॉमर्स या भागातील काही प्रतिनिधी सहभाग घेतला.
१० हजार रोजगाराच्या संधी
राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्यविकास केंद्र उभारण्याची योजना आहे. राज्यातील सुधारित माहिती तंत्रज्ञानामुळे राज्यात १०,००० नवीन रोजगार संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. नव्या स्टार्ट-अप धोरणाखाली निवडलेल्या प्रत्येक प्रस्तावासाठी आर्थिक साहाय्य दिले जात आहे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दोनापावल येथे आयटी
प्रकल्प उभारणार ः मुख्यमंत्री
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाकडून (एसटीपीआय) दोनापावल येथे ४० कोटी रुपये खर्चून आयटी साधन सुविधा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून एसटीपीआय या प्रकल्पासाठी १४ हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध केली जाणार आहे. राज्यातील स्टॉर्टअप आणि आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी प्रोत्साहनपर साधनसुविधा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. व्हायब्रंट गोवा परिषदेत मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. दरम्यान, माहिती तंत्रज्ञान खात्याने स्टॉर्टअप धोरणाखाली १३ आयटी कंपन्यांना प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्याचे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेतील (युएसए) एका व्यापार्याच्या शिष्टमंडळाने इनोव्हेशन हब उभारण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे.