साळगावात कचरा स्वीकारणे बंद केल्याने पणजीत समस्या

0
115

>> मनपाकडून सांडपाण्याचे टँकर पाठवणे सुरूच

पणजी महानगरपालिकेचा ओला कचरा मागील ४ दिवस साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे पणजीत ओला कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झालेली आहे. कचरा स्वीकारला जात नसल्याने कळंगुट, कांदोळी, साळगाव आदी भागातून पणजीत सांडपाणी घेऊन येणारे टँकर परत पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.

साळगाव येथील कचरा प्रकल्पात गेल्या सोमवारपासून पणजीतील कचरा स्वीकारणे बंद झाले आहे. कचरा घेऊन जाणारे ट्रक स्वीकारले जात नसल्याने मागील दोन दिवस कचरा पाठविण्यात आला नाही. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधून या विषयावर चर्चा केली आहे. त्यानंतर महानगरपालिकेने कचरा स्वीकारण्याबाबत एक पत्र साळगाव कचरा व्यवस्थापन मंडळाला पाठविले आहे. या पत्राच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. कचरा स्वीकारण्याबाबत लेखी आश्‍वासन देण्याची विनंती करण्यात आली आहे, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.
गुरूवारी सकाळी सांतइनेज पणजी येथील सांडपाणी निचरा प्रकल्पात ४ टँकर आले होते. कचरा स्वीकारला जात नसल्याने टँकर परत पाठविण्यात आले. बुधवारी २८ सांडपाण्याचे टँकर परत पाठविण्यात आले होते, असेही महापौरांनी सांगितले.

पणजीत डेंग्यूचे ११० रुग्ण
पणजी शहरात डेंग्यूचे ११० रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली. डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेल्या विभागात धुराची फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फवारणी करणारी दोन नवीन यंत्रे विकत घेतली आहेत, असेही महापौर म्हणाले.