लक्ष अयोध्येकडे

0
138

गेली अनेक दशके देशातील एक प्रमुख विवाद बनून राहिलेल्या आणि राष्ट्रीय राजकारणाची दिशाच बदलून टाकलेल्या अयोध्या प्रकरणीची सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढील दैनंदिन सुनावणी अखेर काल संपुष्टात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात सतरा नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. एखाद्या खटल्याची सुनावणी ज्याच्यापुढे होते, त्याच्या कार्यकाळात त्याचा निवाडा आला नाही तर पुन्हा नव्या न्यायमूर्तींपुढे संपूर्णतः नव्याने खटल्याची प्रक्रिया राबवावी लागते असा दंडक आहे. त्यामुळे आपल्या निवृत्तीपूर्वी अयोध्या खटल्याचा निवाडा देता यावा असा सरन्यायाधिशांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात गेल्या सहा ऑगस्टपासून अगदी दैनंदिन स्वरूपामध्ये या खटल्याची सुनावणी चालली. चाळीस दिवसांत ती संपवण्याची मर्यादा घटनापीठाने स्वतःसमोर घालून घेतली होती, त्यानुसार ३९ दिवसांतच सर्व युक्तिवाद आटोपले आहेत. आता अर्थातच प्रतीक्षा आहे निवाड्याची. तो सध्या राखून ठेवला गेला आहे. देशाच्या आजवरच्या इतिहासातील एक सर्वांत महत्त्वपूर्ण बनलेला असा हा खटला आहे. नऊ वर्षांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील त्या २.७७ एकर विवादित जमिनीचे निर्मोही आखाडा, रामलल्ला विराजमान आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तीन भागांत समसमान वाटप करून हा विषय संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो निवाडा स्वीकारला गेला नाही आणि एकूण चौदा याचिका त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. गेल्या ३९ दिवसांमध्ये घटनापीठापुढे सर्व पक्षकारांनी जोरदार युक्तिवाद केले. एकमेकांच्या दाव्यांना खोडून काढण्याचाही प्रयत्न केला. त्यातून अनेक विषयांची सरमिसळ या खटल्यामध्ये झालेली आहे. तथाकथित बाबरी मशिदीच्या उभारणीसंबंधीचे व त्याखालील कथित मंदिरासंबंधीचे पुरातत्त्वीय पुरावे, विवादित जमिनीच्या मालकीसंबंधीचे दावे, त्या जमिनीवरील विविध प्रत्यक्षातील स्थानांसंबधीचे, त्यांच्या व्यवस्थापनांसंबंधीचे दावे अशा अनेक विषयांचा कीस या युक्तिवादांतून पाडला गेला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी चालवलेले सीबीआय चौकशीचे प्रयत्न, त्याच्याविरुद्ध दाखल झालेला फौजदारी गुन्हा, त्याची परिणती म्हणून खटल्याच्या शेवटच्या या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा त्याने केलेला प्रयत्न, इतर मुस्लीम पक्षकारांची त्याच्याशी दर्शवलेली असहमती, मुस्लीम पक्षकारांच्या वकिलाने राममंदिरासंबंधीचा नकाशा न्यायालयातच फाडून टाकण्याचा प्रकार वगैरे अनेक नाट्यमय गोष्टीही या सुनावणी दरम्यान घडल्या. या खटल्याच्या निवाड्याकडे केवळ भारतीय जनतेचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. या निवाड्याला धार्मिक, राजकीय, सामाजिक अशा अनेक मिती आहेत. त्यामुळेच हा विषय अतिशय संवेदनशील बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारचे युक्तिवाद ऐकून घेतलेले असल्याने आता ‘पाचामुखी परमेश्वर’ या न्यायाने हे घटनापीठ जो काही निवाडा देईल तो स्वीकारण्याची सर्व पक्षकारांची मुळात तयारी असली पाहिजे. ती असेल तरच या निवाड्याला अर्थ राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विषयाचा वापर विशिष्ट समाजघटकांना चिथावणी देण्यासाठी होऊ देता कामा नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे फार मोठे आव्हान सरकारपुढे तर असणारच आहे. हा निवाडा वर्चस्ववादाची शेखी मिरवण्याचे साधन बनता कामा नये आणि कोणी त्याला हे आपले खच्चीकरणही समजता कामा नये. जो काही न्याय असेल तो उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर आणि दाव्या – प्रतिदाव्यांच्या वैधतेवर अवलंबून आहे यावर विश्वास ठेवण्याची आधी सर्वांची तयारी हवी. त्यामुळे माध्यमांपासून पक्षकारांपर्यंत सर्वांवरील जबाबदारी वाढते. या निवाड्याला न्यायालयीन निवाडा म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. दुर्दैवाने आजवरचा अनुभव लक्षात घेतला तर हा समंजसपणा दाखवला जाईल याची शाश्‍वती वाटत नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्याचे जे झाले, तेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यासंदर्भात घडले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होईल. अयोध्येचा विषय हा शतकानुशतके चाललेल्या संघर्षातून अत्यंत भावनिक विषय बनलेला आहे. राजकारणासाठी त्याचा वापर झाल्याने तर तो अधिकच स्फोटक बनला. देशामध्ये आज जे धार्मिक विद्वेषाचे जहरी वातावरण दिसते ते काहींसाठी राजकीयदृष्ट्या सोयीचे असेल, परंतु सामाजिकदृष्ट्या ते देशाला कैक युगे मागे नेणारेच आहे. त्यामुळे आज अयोध्येचा विषय सर्व संबंधितांकडून काळजीपूर्वक हाताळला गेला नाही तर त्याचे अतिशय भीषण परिणाम होऊ शकतात. भारताला पाण्यात पाहत आलेल्या बाह्य शक्ती तर ही संधी साधायला टपलेल्याच आहेत. दहशतवादाला चालना देण्यासाठी त्यांना ही सुवर्णसंधी वाटते आहे. त्यामुळे आज गरज आहे ती धार्मिक उन्मादापेक्षा सामंजस्याची. सलोखा अबाधित राखण्याची आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे न्यायदेवतेवरील श्रद्धा अविचल राखण्याची!