ताळगावात आजपासून ‘व्हायब्रंट परिषद’

0
130

>> श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजन

व्हायंब्रट गोवा फाउंडेशनने आयोजित पहिल्या व्हायब्रंट गोवा आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आणि प्रदर्शनासाठी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम सज्ज झाले आहे. या उद्योग परिषदेचे उद्घाटन आज गुरुवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील दोन हजारांच्या आसपास प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या जागतिक व्यापार परिषदेत गोव्यासह भारतातील नामांकित व्यावसायिक आस्थापनांकडून आपल्या उद्योग, व्यवसायाचे प्रदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती व्हायब्रंट गोवाचे अध्यक्ष राजकुमार कामत यांनी काल दिली. या परिषदेनिमित्त उभारण्यात येणार्‍या स्टॉल्सचे काम पूर्ण झाले. स्टॉल्समध्ये सजावटीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

या परिषदेत सहभागी होणार्‍या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधीचे गोव्यात आगमन होण्यास कालपासून प्रारंभ झाला आहे. तीन दिवसाच्या या परिषदेमध्ये उद्योगाबाबत मार्गदर्शन करणार्‍या मान्यवरांची व्याख्यानेसुद्धा होणार आहेत.
व्हायब्रंट गोवा परिषदेच्या माध्यमातून गोव्यातील व्यवसाय वृद्धीसाठी अनेक संधी चालून येत आहेत. राज्यातील लहान तसेच मोठ्या व्यावसायिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हायब्रंट गोवा व्यापार परिषद स्थानिक उद्योजकांसाठी सुवर्णसंधी आहे. या परिषदेत विदेशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (जीजीसीआय) काही देशातील कॉमर्स संस्थांशी उद्योगाच्या आदान प्रदानासाठी सामंजस्य करार केले जाणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी व्यापार व्यवसायासंबंधीच्या विषयांवर अनेक शिष्टमंडळे चर्चा करणार असून व्यापाराच्या आदान प्रदानाबाबत सामंजस्य करार केले जाणार आहेत.