३० नोव्हेंबरपर्यंत खड्डे बुजवणार

0
110

>> सरकारची न्यायालयात माहिती

राज्य सरकार रस्त्यावरील खड्‌ड्यांबाबत गंभीर असून रस्त्यांवरील खड्‌ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दिली.

याचिकादार हा रस्त्यावरील खड्‌ड्यांच्या दुरुस्तीबाबत गंभीर नाही. याचिकादार हा एका राजकीय पक्षाचा सरचिटणीस असून राज्यातील रस्त्यावरील खड्‌ड्यांच्या याचिकेच्या माध्यमातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा सरकारी वकिलांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयात केला. खंडपीठाने सरकारी वकिलांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेऊन याचिकादाराला समज दिली. तसेच, या याचिकेतून याचिकादार म्हणून स्वतःहून बाहेर पडण्याची सूचना केली. न्यायालयाने याचिकेची स्वेच्छा दाखल घ्यावी, अशी विनंती याचिकादाराने केली. तसेच, याचिकेतून बाहेर पडण्याची तयारी दर्शविली. न्यायालयाने या याचिकेसाठी ऍड. गौरांग पाणंदीकर यांची नियुक्ती केली आहे.

गोवा खंडपीठाने राज्य सरकारला राज्यातील रस्त्यावरील खड्‌ड्याच्या दुरुस्तीबाबत कृती आराखडा सादर करण्याचा निर्देश दिला होता. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने रस्त्यावरील खड्‌ड्याच्या दुरुस्तीबाबत सविस्तर माहिती न्ययालयात सादर केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १८ डिसेंबर २०१९ रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे सरकारने रस्त्यावरील खड्‌ड्याच्या दुरुस्तीच्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे.