गोवा महिला संघाचा पराभव

0
99

वरिष्ठ महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत गोवा संघाला काल मंगळवारी तमिळनाडू संघाकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. राजकोट येथे हा सामना झाला. गोवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर तामिळनाडू संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून १४९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यांच्या निरंजना नागराजन हिने ११ चौकार व १ षटकारांसह ४६ चेंडूंत ७४ धावांची शानदार खेळी केली. तर कीर्तना हिने ३८ धावांचे योगदान दिले. गोवा संघाकडून संजुळा नाईकने ४ षटकांत केवळ १९ धावा देत ३ बळी घेतले. इतर गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. कर्णधार संजुळाने यानंतर फलंदाजीतही चमक दाखवताना ५३ चेंडूंत ९ चौकारांसह आपली ६० धावांची खेळी सजवली. सुनंदा येत्रेकरने २९ धावा करत तिला चांगली साथ दिली. पण, निकिता मळीक (८), विनवी गुरव (३), श्रेया परब (८) या चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या खेळाडूंनी निराशा केली. पूर्वजा वेर्लेकरने १९ धावा जमवल्या. तामिळनाडूच्या रम्यश्रीने सर्वाधिक २ बळी घेतले. गोव्याचा पुढील सामना अरुणाचल प्रदेश संघाशी गुरुवार १७ रोजी होणार आहे. सिकंदराबाद येथे हा सामना खेळविला जाणार आहे.