- डॉ. सूरज सदाशिव पाटलेकर
एम.एस.(आयु.), मडगाव
भूक लागेल त्याच वेळी खावे, तहान लागेल त्याच वेळी पाणी प्यावे. ज्यावेळी आपल्या शरीराला वाटेल की पाणी कमी आहे शरीरात, उदाहरणार्थ – ग्रीष्म ऋतू/उन्हाळयामध्ये, घाम जास्त येतो व शरीरातले पाणी कमी होते त्यावेळी शरीर आपल्याकडून मागवून घेईल.
आपण आपले आरोग्य जपण्यासाठी किती काळजी घेतो? ते करायची आपली इच्छा तर असते पण त्यासाठी आपण खरेच एखादे पाऊल मनापासून उचलतो का? मी जीममध्ये जाते/जातो. जीममध्ये जाणे हे आरोग्य राखणे नव्हे. जीमला जाऊन शरीरसौष्ठव/बॉडी बिल्डिंग होईलही, पण हे शरीरसौष्ठव म्हणजे स्वास्थ्य नव्हे. तुम्ही म्हणत असाल की आत आम्ही ‘ट्रेडमिल’वर खूप पळतो. दोरी उड्या मारतो. ते एखाद्या वेळी चालेलसुद्धा. पण जिथे हे सर्व केले जाते तो कक्ष जर वातानुकूलित असेल किंवा आजूबाजूला पंखे चालू असतील तर त्या गार हवेमुळे ही शरीरामधली सर्व छिद्रे बंद होतील व घाम बाहेर येणे अशक्य होऊन जाईल. पंखे व Aएसी जरी बंद कराल तरीसुद्धा आत हवा कशी खेळती राहील? त्यासाठी एक्झॉस्ट फॅन? अशा किती कृत्रिम गोष्टींवर आपण अवलंबून राहणार? जीम हा ट्रेन्ड आहे ह्यात दुमत नाही. जागेच्या कमतरतेमुळे/ हवामानामुळे आपल्याला बाहेर जाणे शक्य होत नसेल म्हणून आपण जीम हा पर्याय निवडला हे पण मान्य. जीमला पूर्णपणे विरोध करणे हे चुकीचेच ठरेल. तरीही स्वास्थ्य हे फक्त व्यायामाने येत नसते. ते जेवढे शारीरिक असते तेवढेच मानसिक, सामाजिक इतरसुद्धा असते. त्यासाठी आपण काय खातो, पितो, काय करतो इतर गोष्टी पण तेवढ़्याच महत्त्वाच्या आहेत. जीममध्येपण काही लोकांना फ्रिजमधले पाणी पिण्याची खूप हौस असते. अशाने तर परिस्थिती अजूनच बिकट होऊन जाईल. प्यायचे पाणी हे शक्यतो कोमट किंवा गरमच असावे. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत जेकाही आपण करतो त्या सर्व गोष्टींवरसुद्धा आपले आरोग्य अवलंबून असते.
उदाहरणार्थ- समजा की आपण रात्री उशिरा झोपलो. मग साहजिकच सकाळी लवकर उठायला त्रास होईल. कारण कमीतकमी ७-८ तास रात्रीची झोप ही शरीराची गरज आहे व ती व्यवस्थित व्हायला आपण नक्कीच उशिरा उठणार.
आणि जरी सकाळी लवकर उठलो, तर झोप ही नक्कीच पूर्ण झालेली नसेल. असे जर झाले तर त्यानंतर डोकेदुखी, झापड आल्यासारखे वाटणे, दिवसभर थकवा, डोळे लाल, इतर त्रास हे तर माहितीच असतील. पूर्ण दिवस वाया. मग तुम्ही दिवसा झोपण्याचा प्रयत्न करणार व दिवसा झोपल्यामुळे, पुन्हा रात्रीची झोप उशिरा येईल. आणि असे हे विशिष्ट चक्र चालूच राहील. अशाने शरीराचे संतुलन बिघडेल व मानसिकदेखील. पूर्ण दिवसभर काम करून, शरीराला रात्रीची झोप व आराम जर मिळत नसेल तर मग ते शरीर पण कमकुवत आणि अशक्त होऊ लागते आणि येथेच ते सर्व आजारांना आमंत्रण देते.
… त्यासाठी रात्री वेळेत झोपणे व सकाळी सूर्योदयाच्या वेळेत उठून, सर्वांत अगोदर मलमूत्रांचे विसर्जन करावे व त्यानंतर आंघोळ आणि सूर्यनमस्कार, योगासन इतर करणे … हे शरीराला अत्यंत हितकारक आहे. अजून एक गोष्ट जी आयुर्वेदाच्या नावाखाली खपवली जाते व लोक त्या गोष्टीचे अनुसरण करतात ती म्हणजे सकाळी उठल्यावर लीटरभर पाणी पिणे. असा चुकीचा समज करून ठेवला आहे हे सांगून की असे केल्याने शौचाचा वेग व्यवस्थित येतो. हा आपल्या मनाचा गोड गैरसमज आहे.
… जे पाणी आपण पितो ते जाईल आमाशय (स्टमक) व वृक्क (किडनी)मध्ये. आपली पचनसंस्था ही अग्नी प्रमाण आहे. आग/अग्नी जशी प्रज्वलीत होते तशी आपल्याला भूक पण लागते. जर ह्याच अग्नीवर आपण सकाळी एक लीटर पाणी ओतले तर? ही आग विझणार नाही का? आणि मग पुढील दिवसभरात व्यवस्थित भूक कशी लागेल? आणि भूक नसताना काही खाल्ल्यास, त्या गोष्टीचे पचन कसे होईल? त्यामुळेच नंतर पचनसंस्थेसंबंधी आजार उत्पन्न होतात, जसे की पोट नेहमी भरल्यासारखे किंवा पोटात वायू/गॅस भरल्यासारखे वाटणे, शौचास घट्ट व त्रासदायक होणे, अर्श(मोड), परिकर्तीका (गुद प्रदेशी भेगा पडणे), ढेकर येणे, अम्लपित्त (गळ्यापाशी आंबट येणे), डोकेदुखी इतर.
हे झाले पचनसंस्थोसम्बंधित.
… आता आपण जर वृक्काबद्दल विचार केला तर असे लक्षात येईल की प्रत्येक अवयवाची एक विशिष्ट क्षमता असते. वृक्क हे एका दिवसात २-३ लीटर द्रव फिल्टर (द्रव गाळून घेण्याची प्रक्रिया) व्यवस्थितरीत्या करू शकते. मग आपले पाणी पिण्याचे प्रमाण हे दिवसाला ४-५ लीटर जर असेल तर ह्या वृक्कांवर अतिरिक्त काम करण्याचा भार नाही का येणार? तुम्ही कितीही पाणी प्यायलात तरी वृक्क हे आपल्या परिनेच फिल्टरची क्रिया चालू ठेवेल पण त्यावरचे दडपण व भार वाढेल. जर अगोदर त्यांना ४ तास द्रव फिल्टर करण्यासाठी लागत असेल तर आता जास्त वेळ ओव्हरटाइम करावा लागेल. आणी कुठलीही गोष्ट अति प्रमाणात जर एखादा अवयव करेल तर पुढे जाऊन त्याचे प्राकृत कार्यदेखील बिघडेल. व हे द्रव/पाणी/लघ्वी जर वेळेत शरीराच्या बाहेर गेली नाही तर ती वृक्क किंवा मूत्राशयामध्येच जमा होऊन राहील आणि तेथे सूज उत्पन्न होईल (उदाहरणार्थ वृक्कामध्ये हायड्रोनेफ्रोसिस, मूत्राशयामध्ये सिस्टायटीस व इतर ठिकाणीही). जर तो द्रव एकाच ठिकाणी जास्त काळ साठून राहिला तर त्यामधील जे कॅल्शियम डिपॉझिटसारखे इतर हे तळाला जाऊन राहतील. व ह्या गाळाचे रूपांतर मुत्राश्मरी/मुतखड़्यांमध्ये होईल व हे जर चालूच राहिले तर पुढे जाऊन वृक्काचे कार्य बंद पडेल (किडनी/रिनल फेल्युअर). मग अशा परिस्थितीमध्ये आपण अति प्रमाणात पाणी प्यावे का? आपल्या शरीराला सगळे काही समजत असते. जेथे ज्या गोष्टीची शरीराला उणीव भासेल, तेथे व तसे ते आपल्याला संकेत देईलच.
… म्हणूनच भूक लागेल त्याच वेळी खावे, तहान लागेल त्याच वेळी पाणी प्यावे. ज्यावेळी आपल्या शरीराला वाटेल की पाणी कमी आहे शरीरात (उदाहरणार्थ – ग्रीष्म ऋतू/उन्हाळयामध्ये, घाम जास्त येतो व शरीरातले पाणी कमी होते त्यावेळी; किंवा अति प्रमाणात जुलाब व उलट्या झाल्याने पण शरीरातले पाणी कमी होऊन अशक्तपणा ज्यावेळी येतो; अशा इतर कारणांमुळे देखील) त्या वेळेस शरीर आपल्याकडून मागवून घेईल.
पण बर्याचदा आपल्याला एखादा गोड/आवडता जिन्नस/पेय समोर आला की भूक लागल्यासारखी वाटते. ती भूक/तहान खोटी/सूडो असते. अशा वेळेस जपूनच खावे. २ जेवणांच्या (समजा सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण/दुपारचे व रात्रीचे जेवण) मध्ये काही न खाल्लेले बरे. असे केल्याने पचनपण व्यवस्थित चालू राहते. ह्या काळामध्ये जर फक्त कोमट पाणी पिणे शक्य असेल तर प्यावे. पचनाला मदतच होईल. उचित प्रमाणात जेवले पाहिजे. न अधिक न कमी. जास्त उपवास झाल्यामुळेसुद्धा अम्लपित्त (ऍसिडिटी) होऊ शकते. जे वाढलेले प्राकृत पित्त पोटात असते ज्यामुळे आपल्याला भूक लागते, ते कमी करायला जेवण गरजेचे आहे. व जर असे नाही तर मग हेच पित्त बाकीच्या गोष्टींबरोबर पोटातून वर येते व अम्लपित्त उत्पन्न करते. मग छातीत जळजळ होणे इतर त्रास चालू होतात. तर ह्या काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत.