मद्य विक्रीच्या दैनंदिन तपशीलासाठी मोबाईल ऍपची सध्या सक्ती नाही

0
124

>> अबकारी आयुक्तांचे स्पष्टीकरण

अबकारी खात्याने मद्य विक्रेत्यांनी मद्य विक्रीचा दैनंदिन तपशील ठेवण्यासाठी तयार मोबाईल ऍप तूर्त सक्तीचे नाही. मद्य व्यावसायिक त्यांच्या जुन्या पद्धतीने मद्य विक्रीचा हिशेब ठेवू शकतात, असे स्पष्टीकरण अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे काल दिले.

अबकारी खात्याने राज्यातील मद्य व्यावसायिकांना एसएमएस संदेश पाठवून मद्य विक्रीचा दैनंदिन तपशिलासाठी मोबाईल ऍपचा वापर करण्याची सूचना केल्यानंतर काही जणांनी मोबाईल ऍपला आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांनी ऍपचा फेरविचार करण्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर अबकारी आयुक्त सतिजा यांनी वरील खुलासा केला आहे. अबकारी खात्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनआयसीकडून मद्य व्यावसायिकांना मद्यविक्रीबाबत दैनंदिन तपशील ठेवण्यासाठी एक ऍप तयार करून घेतलेले आहे. मार्च २०१९ पासून या मोबाईल ऍपचा वापर सुरू करण्यात आला आहे. आत्तापर्यंत १ हजार मद्यविक्रेते या ऍपचा वापर करीत आहेत.

मोबाईल ऍप हिशोब ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने मद्य व्यावसायिकांकडून ऍपचा वापर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करण्यासाठी सर्व मद्य व्यावसायिकांना एसएमएस संदेश पाठवून ऍपचा वापर करण्याची सूचना करण्यात आली, असे पत्रकात म्हटले आहे. दुरूच्या बंद (पॅक) बॉटलचा व्यवसाय करणार्‍या घाऊक आणि किरकोळ मद्य विक्रेत्यासाठी हा ऍप मर्यादित आहे. बार, रेस्टॉरंट, तावेन व्यावसायिकांना हा ऍप लागू होत नाही. अबकारी कायद्यानुसार मद्य व्यावसायिकांना मद्य विक्रीचा तपशील ठेवणे बंधनकारक आहे. मद्य व्यावसायिकांकडून आपल्या वहीमध्ये मद्यविक्रीचा तपशील ठेवला जातो आणि दर महिन्याला खात्याकडे तपशील सादर केला जातो, असेही पत्रकात म्हटले आहे.