दिलेली आश्‍वासने पाळण्याची आमच्यात धमक : पंतप्रधान

0
137

>> महाराष्ट्रात नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा

थकलेले साथीदार एकमेकांचे आधार होऊ शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील युवकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत. दिलेली आश्वासने पाळण्याची धमक आमच्यात आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांची काल महाराष्ट्रातील जळगाव येथे विधानसभा निवडणुकीसाठी पहिली जाहीर प्रचार सभा झाली. या सभेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांना नक्राश्रू गाळणे बंद करून लोकांना मूर्ख बनवण्याचे थांबवा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी, हिम्मत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेले कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवण्याचं आश्वासन द्यावे असे आव्हान दिले. यावेळी त्यांनी तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असेही आव्हान दिले.

भंडार्‍यात पंतप्रधानांची सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावनंतर भंडार्‍यात साकोळी येथे प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार आणि सक्षम, युवा नेतृत्व लाभले आहे. सबका साथ सबका विकास हा मंत्र आम्ही देशाला दिला. आता या मंत्राला विश्वासही मिळाला आहे. आमची नीती आज जनकल्याणापासून राष्ट्रकल्याणाची आहे. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे आता जितके लक्ष दिले जात आहे तितके यापूवीर्ज्ञ कधी दिले जात नव्हते अशं सांगत पंतप्रधानांनी येत्या काही वर्षांमध्ये गावांमध्ये पायभूत सुविधा आणण्यासाठी २५ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगितले.