- दत्ता भि. नाईक
२०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अब्देल फत्ताह अल् सिसी यांची अध्यक्षपदी निवड झाली. अल् सिसी यांच्या विरोधात सध्या देशात जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. एकेकाळी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेला अब्दुल फताह अल् सिसी आता काय करतो तेच पाहावयाचे आहे.
इजिप्त हा आफ्रिका खंडाच्या ईशान्येला वसलेला देश आहे. भौगोलिकदृष्ट्या आफ्रिकन असले तरीही इजिप्तपासून मोरोक्कोपर्यंतच्या देशात वसलेले लोक स्वतःला अरब म्हणवून घेतात. सन २०११ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी सत्ता सोडल्यापासून देशाच्या नशिबात जणू राजकीय अस्थिरता लिहिल्यासारख्या घटना घडत आहेत. नाईल नदीच्या पाण्यामुळे स्वतःचे अस्तित्व टिकवून धरलेल्या या देशाला ‘नाईल नदीची देणगी’ या नावाने ओळखले जाते. इंग्रजांचे सामाज्य जगभर पसरले होते. त्याकाळात साम्राज्याच्या देखरेखीखालीच या प्रदेशाची तुर्की पाशांच्या हाती सत्ता होती. त्यानंतर १९२२ साली इजिप्तमधील राजघराण्याच्या हातात सत्तेचे हस्तांतर इंग्रजांच्या देखरेखीखाली करण्यात आले. १९५६ साली गमाल अब्दुल नासेर यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तमध्ये क्रांती घडवून सत्तांतर करण्यात आले, तेव्हापासून इजिप्त हे प्रजासत्ताक राष्ट्रराज्य आहे.
अलिप्त राष्ट्र चळवळीतील रफिक
जवळ जवळ सात हजार वर्षांपूर्वीचे पिरॅमिड व स्फिंक्स या नावाने ओळखले जाणारे स्थापत्त्यशास्त्राचे आश्चर्यकारक नमुने या देशात आढळत असले तरीही आज इजिप्तमध्ये वास करत असलेल्या प्रजेचा ही निर्मिती करणार्यांशी वांशिकदृष्टीने कोणताही संबंध नाही. या देशाच्या सीमा प्राचीन काळात कुठपर्यंत होत्या याचा अंदाज लागत नसला तरीही दोन महासागरांना जोडणार्या या देशात पूर्वीपासून लोकांचे येणे-जाणे होते हे लक्षात येते. युरोपमध्ये कोणत्याही मार्गाने प्रजेचे ख्रिस्तीकरण करण्याचा वरवंटा राजाज्ञेने फिरू लागला तेव्हा बरेच युरोपीय व विशेष करून फ्रान्समधील लोक इजिप्तमध्ये स्वसंस्कृती टिकवण्यासाठी येऊन स्थायिक झाले. परंतु काही शतकांनंतर इजिप्तचे अरबीकरण व इस्लामीकरण सुरू झाले तेव्हा बरेचजण फ्रान्समध्ये पुन्हा जाऊन स्थायिक झाले. देशात नव्वद टक्के जनता सुन्नी पंथीय मुसलमान असून दहा टक्के ख्रिस्ती आहेत व त्यांपैकी नऊ टक्के हे ‘कॉप्टिक चर्च’ला मानणारे ख्रिस्ती आहेत. त्यांची चर्चमधील प्रार्थनेची भाषा कॉप्टिक असून स्वतःची इजिप्शियन संस्कृती वाचवण्यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्माचा आधार घेतलेला असूनही युरोपमधील कोणत्याही चर्चशी संधान बांधलेले नाही.
अशा या विश्वाच्या नकाशात स्थान प्राप्त केलेल्या देशाचा अलिप्त राष्ट्र चळवळीच्या स्थापनेत मोठा वाटा होता. या चळवळीचे संस्थापक सदस्य भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो व इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर हे ‘रफिक’ म्हणजे मित्र या संज्ञेने ओळखले जात असत. नासेरच्या मृत्यूनंतर अन्वर सादत व त्याची हत्या झाल्यानंतर होस्नी मुबारक असे इजिप्तमध्ये सत्तांतर होत गेले. होस्नी मुबारक यांना लोकक्षेभामुळे सत्ता सोडावी लागली व देशात राजकीय अस्थैर्य सुरू झाले.
न उलगडणारे कोडे
मुबारक सत्तेवरून उतरताच मुहम्मद मोर्सी यांना जनतेने अध्यक्षपदी निवडून दिले. त्यांच्यामागे मुस्लीम ब्रपरहूड ही संघटना आहे हे लक्षात येताच लष्कराने त्यांची उचलबांगडी करण्यासाठी मोहीम उघडली. मोर्सी यांना एका वर्षाच्या आत सत्तेच्या बाहेर केल्यानंतर लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या कामी लष्कर यशस्वी होईल असे वाटले होते; परंतु नवीन सत्ताबदल करण्याकरिता त्यांना २०१४ पर्यंत वाट पाहावी लागली. २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अब्देल फत्ताह अल् सिसी यांची अध्यक्षपदी निवड झाली. अल् सिसी यांच्या विरोधात सध्या देशात जोरदार निदर्शने सुरू झाली असून सत्तेची खुर्ची काटेरी असल्याचा त्यांनाही अनुभव येऊ लागलेला आहे.
हल्ली फारसा चर्चेत नसलेला इजिप्त पुन्हा एकदा जागतिक राजकारणात गाजू लागल्यामुळे सर्वांचे लक्ष आता तेथील राजकीय परिस्थितीवर खिळलेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इजिप्तने तरुणांचा फार मोठा उद्रेक झालेला पाहिला. २०११ च्या जनगणनेप्रमाणे साडेआठ कोटी लोकसंख्येचा हा देश. आपल्या देशाशी तुलना करता या देशातील समस्या म्हणजे कस्पटासमान असाव्यात असे वाटते. इतकी कमी लोकसंख्या असूनही समस्या-समाधानात दिरंगाई का होते? संपूर्ण देशाची भौगोलिक स्थिती सारखी असल्यामुळे दळणवळणासाठी सोपी अशी परिस्थिती असूनही अधूनमधून लोकक्षोभाचा प्रचंड उद्रेक का होतो? हे एक न उलगडणारे कोडे आहे.
दोन हजारहून अधिक युवक तुरुंगात
२०१४ साली सत्तेवर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अल् सिसी यांच्या विरोधातील हा मोठा उद्रेक आहे. सरकारच्या आदेशावरून दोन हजारहून अधिक युवक सध्या निरनिराळ्या तुरुंगांत रवाना केलेले असून कैरो व इतर शहरांची नाकेबंदी करण्यात आलेली आहे. सर्वत्र गणवेश न घातलेले पोलीस तैनात केलेले आहेत. ज्या ठिकाणी निदर्शने होऊ शकतात अशा स्थानांना या साध्या वेशातील पोलिसांनी अक्षरशः गराडा घातलेला आहे. तरीही त्यांच्याजवळ असलेल्या रायफल्समुळे त्यांची उपस्थिती लक्षात येते. नाईल नदीवरील सुप्रसिद्ध पुलावरही पोलिसांची गस्त चालू आहे.
सध्या संपर्कक्षेत्र इतके विस्तारलेले आहे की एखादे आंदोलन संपर्कमाध्यमातून चालवले जाते, हे लक्षात आल्यामुळे संपर्कावर नियंत्रण तर घातलेच आहे, याशिवाय वार्तांकन करणार्या वेबसाईट्सवरही बंधने लादलेली आहेत. संपूर्ण देशात आणीबाणीसदृश्य वातावरण उत्पन्न झालेले आहे. अलजझीरा या पश्चिम आशियामध्ये कार्यरत असलेल्या प्रसारमाध्यमात मान्यता असलेल्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दहा लाख युवकांना मोर्च्याचे आवाहन केले गेलेले आहे, यावरून या आंदोलनाच्या आवाक्याचा अंदाज येतो.
आंदोलनाच्या काळात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे अधिवेशन चालू होते. जगातील सर्व देशांच्या समस्यांचा येथे उल्लेख होणे अपरिहार्य आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल् सिसी यांनीही देशात चाललेल्या आंदोलनाबद्दल विचार व्यक्त करून याबाबत चिंता करण्याची कोणतीही गरज नसून इजिप्त हा एक समर्थ देश आहे व इजिप्तच्या जनतेचे मी आभार मानतो अशा अर्थाचे विचार मांडले. कोणताही सत्ताधारी जागतिक व्यासपीठावर स्वतःच्या देशासमोरील अडचणी मांडत नसतो. देशात प्रसारमाध्यमांवर लादलेल्या बंधनांची अल् सिसी यांनी चर्चा होऊ दिली नाही व देशांतर्गत समस्यांना आंतरराष्ट्रीय रूप येऊ दिले नाही.
सरकारविरोधात असंतोष
सरकारविरोधी आंदोलन चालवणारी व्यक्ती सध्या तरी अनामिक असून स्वतःहून अज्ञातवासात गेलेली आहे. त्याचबरोबर आंदोलनाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. वीस वर्षांचा युवक मोस्ताफा म्हणतो की, आम्ही आता मुस्कटदाबी सहन करणार नाही. शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या निदर्शनात भाग घेतलेले अनेक युवक स्वतःचे नाव उघड करण्यास तयार नाहीत. आमच्या आयुष्यातील हा सर्वात सुखाचा काळ असावा अशी आमची अपेक्षा होती, परंतु आम्हाला या फॅसिस्ट शासनाने राजकीय व आर्थिक दृष्टीने पूर्णपणे चिरडून टाकले आहे. शुक्रवारच्या आंदोलनापासून जे दूर राहिले त्यांच्याही मनात सरकारबद्दल असंतोष खदखदत असलेला दिसून येतो. स्वतःचे नाव न सांगता मते व्यक्त करणार्यांची बरीच मोठी संख्या आहे. त्यांपैकी एकाचे म्हणणे आहे की, अटक चुकवण्यासाठीच तो आंदोलनापासून दूर राहिलेला आहे.
अल् सिसी यांच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील एक तृतियांश जनता गरिबीत खितपत पडलेली आहे. देशाच्या जुलैमध्ये प्रकाशित झालेल्या सरकारी निष्कर्षांवर त्यांचे हे मत आधारलेले आहे. थोडासुद्धा विरोध सहन न करण्याच्या त्याच्या वृत्तीला लोक कंटाळलेले असून जनतेच्या उद्रेकामुळे २०११ व २०१३ साली जसा सत्ताबदल घडवून आणला गेला तसाच सत्ताबदल घडवून आणण्यासाठी जनता उत्सुक असल्याचे दिसून येते.
शुक्रवारच्या निदर्शनात भाग घेतलेल्यांमध्ये मोहमद शाबान या सतरा वर्षीय गरीब युवकाचे म्हणणे आहे की, काहीही होवो, आम्ही सत्ताबदल घडवून आणणार आहोत. तो राजधानी कैरोपासून जवळच असलेल्या डोक्की या उपनगराचा रहिवासी आहे. २०११ सालच्या निदर्शनात भाग घेणार्या आई-वडिलांच्या कडेवर असलेला अली मोहमद आता एकोणतीस वर्षांचा नवयुवक आहे. त्याच्यासमोर जे देशाचे स्वप्न आहे ते साकार करावयाचे असेल तर अल् सिसी सत्तेवरून पायउतार झालेच पाहिजे, असे त्याचे मत आहे. मोठ्या दिमाखाने सत्तेच्या खुर्चीवर आसीन झालेला, एकेकाळी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेला अब्दुल फताह अल् सिसी आता काय करतो तेच पाहावयाचे आहे.