काश्मीर दोन महिन्यांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुले

0
118

जम्मू – काश्मीर प्रशासनाने काल आदेशाद्वारे पर्यटकांना जम्मू – काश्मीरात जाण्यास मोकळीक असल्याचे तसेच पर्यटकांना तेथे कोणत्याही प्रकारचे सहाय देण्यात येईल, असे जाहीर केले. गेल्या २ ऑगस्ट रोजी प्रशासनाने त्यावेळी तेथे असलेल्या पर्यटकांनी राज्य सोडावे असे निर्देश जारी केले होते. तो आदेश आता मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

२ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना जम्मू – काश्मीर सोडण्याचा आदेश दिल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्य दर्जा देणारे कलम ३७० रद्दबातल केले होते. तसेच जम्मू-काश्मीर व लडाख यांचे संघ प्रदेशांत विभाजन केले होते. आत हे प्रदेश ३१ ऑक्टोबरपासून संघ प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.
पर्यटकांसह त्यावेळी असलेल्या अमरनाथ यात्रेकरूंनाही २ ऑगस्टच्या त्या आदेशान्वये तातडीने राज्य सोडण्यास बजावण्यात आले होते. त्यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी २ ऑगस्ट रोजीचा तो आदेश १० ऑक्टोबरच्या तारखेने मागे घेण्याचे निर्देश गृह खात्याच्या अधिकार्‍यांना दिले. प्रशासनाच्या या निर्णयाचे जम्मू-काश्मीरमधील पर्यटन क्षेत्रातील संबंधितांनी स्वागत केले असून येथील पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा बहरण्याची आशा व्यक्त केली आहे.

काश्मीरातील ३ राजकीय
नेते स्थानबद्धतेतून मुक्त

जम्मू-काश्मीर प्रशासनाने काल यावर मीर, नूर महंमद आणि शोयब लोने या स्थानबद्धतेत असलेल्या राजकीय नेत्यांची त्यातून मुक्तता केली. विविध कारणांवरून त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. यावर मीर हे पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) रफियाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत. लोने यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे उत्तर काश्मीर मतदारसंघासाठी निवडणूक लढवली होते. मात्र ते पराभूत झाले होते. तर नूर महंमद हे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ५ ऑगस्टनंतर जम्मू-काश्मीरमधील सुमारे हजारभर लोकांना स्थानबद्ध करण्यात आले होते.