राज्यातील पोलीस, अग्निशमन, आरोग्य सेवेसाठी असलेल्या वेगवेगळ्या टोल फ्री क्रमांकांना पर्याय म्हणून सर्वांसाठी एकच ११२ हा आपत्कालीन क्रमांक गोव्यात लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या आपत्कालीन ११२ क्रमांकाचा शुभारंभ पोलीस मुख्यालयात काल करण्यात आला. एकाच आपत्कालीन क्रमांकामुळे गरजूंना वेळेवर मदत मिळण्यास मदत होणार आहे. नवीन ११२ या आपत्कालीन क्रमांकांच्या सेवेच्या दुसर्या टप्प्यात रुग्णवाहिका सेवेचा समावेश केला जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यासेवेचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.
नवीन आपत्कालीन यंत्रणा सेवेला पहिल्या टप्प्यात पोलीस दलाला जोडण्यात आले आहे. तर, दुसर्या टप्प्यात रुग्णवाहिका सेवा, अग्निशामक सेवा लवकरच जोडली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
गैरसोय दूर होणार
राज्यातील जनतेला पोलीस मदतसेवेसाठी १००, अग्निशामक सेवेसाठी १०१, रुग्णवाहिका सेवेसाठी १०८ व महिला व बालकांसाठीच्या मदत सेवांसाठी वेगवेगळे क्रमांकांशी संपर्क करताना नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. त्यामुळे संबंधितांना आवश्यक साहाय्य वेळेवर मिळण्यास अडचण होत होती. आता केवळ ११२ या एकाच क्रमांकामुळे गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून संबंधिताकडून आवश्यक मदत वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे. या नवीन सेवेमुळे गुन्हयांच्या प्रमाणात घट होण्याची शक्य्ता आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्राकडून आदेश
केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीखाली गोव्याला ११२ हा आपत्कालीन क्रमांक वापरण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन आपत्कालीन ११२ क्रमांक हाताळण्यासाठी पोलीस मुख्यालयात खास अत्याधुनिक सुविधांनी युक्त नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २० पोलीस गाड्यांना गरजूंना मदत करण्यासाठी अत्याधुनिक संदेशवहन यंत्रणा बसविण्यात आली आहे. दक्षिण व उत्तर गोवा या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी १० पोलीस जीपगाड्यांची सोय करण्यात आली आहे. आगामी काळात आणखी २० जीपगाड्यांना नवीन संदेशवहन यंत्रणा बसवून सेवेत वाढ केली जाणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षात कॉल्स स्वीकारण्यासाठी १५ पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन ११२ या क्रमांकांशी संपर्क साधणार्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नवीन तंत्रज्ञानामुळे मिळण्याची सोय आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंह यांनी दिली.
या सेवेच्या पहिल्या टप्प्यात पोलीस दलाला आणण्यात आले असून दुसर्या टप्प्यात अग्निशामक आणि रुग्णवाहिका सेवेचा समावेश केला जाणार आहे. तूर्त सर्व सेवेसाठी ११२ क्रमांक डाईल केल्यास अग्निशामक व रुग्णवाहिका सेवेची मदत उपलब्ध करण्याची सोय नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.