काश्मीरात ५०० दहशतवादी घुसण्याच्या तयारीत

0
130

>> सुरक्षा दलांसाठी सर्वत्र हाय अलर्ट

भारतीय हवाई दलाने काही काळापूर्वी उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर प्रशिक्षण घेतलेले सुमारे ५०० दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दुजोरा दिला असून संभाव्य दहशतवादी हल्ले उधळून लावण्यासाठी भारतीय सुरक्षा दले पूर्ण सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केलेला बालाकोट दहशतवादी प्रशिक्षण तळ पाकिस्तानने पुन्हा सुरू केला असल्याचे जनरल रावत यांनी म्हटले आहे. तेथे प्रशिक्षण घेतलेले सुमारे ५०० दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवरून तेथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून ते जम्मू-काश्मीरात घुसण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सदर दहशतवादी महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य दर्जा रद्द केल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत वाईट व अशांत बनल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखविण्यासाठी पाकिस्तानकडून कट रचला जात आहे. त्याचाच भाग म्हणून जम्मू-काश्मीरात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न पाककडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या बिमोडासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दरम्यान चेन्नई येथे लष्कर प्रमुख रावत यांना बालाकोट दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्यामुळे २६ फेब्रुवारी सारखी कारवाई यावेळी करणार काय असा विचारले असता त्यांनी तशीच कारवाई यावेळी करणार अशी अपेक्षा का बाळगता असा प्रतीप्रश्‍न केला. त्या कारवाईचीच पुनरावृत्ती का म्हणून? काही तरी वेगळे का नको? आम्ही यावेळी काय करणार हे आधीच का सांगावे? असे अनेक प्रश्‍न रावत यांनी उपस्थित केले.

बालाकोट तळावरील कारवाया पुन्हा सुरू झाल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना चार दिवसांपूर्वीच मिळाली आहे. नजीकच्या सणांपूर्वी हे संभाव्य दहशतवादी हल्ले अधिक गंभीर स्वरुपाचे होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. असे असले तरी त्या हल्ल्यांना उधळून लावण्यासाठी योग्य योजना आखण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही पातळीवरून, कोणत्याही पल्ल्यावरून आणि कोठेही प्रतिहल्ले करण्यासाठी भारतीय सुरक्षा दले पूर्ण सज्ज असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

बालाकोटमध्ये नव्याने कारवाया अलीकडेच ः रावत

चेन्नईत पत्रकारांशी बोलताना लष्कर प्रमुख बिपिन रावत म्हणाले, हे पहा मी तुम्हाला सांगू इच्छितो की बालाकोट दहशतवादी तळावरील कारवाया पुन्हा अलीकडेच सुरू झाल्या आहेत. तेथील दहशतवाद्यांची संख्या ही हवामानानुसार बदलत असते. मात्र सध्या तेथील ५०० दहशतवादी काश्मीरात घुसण्याच्या तयारीत आहेत. ही संख्या किमान आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. जेव्हा बर्फ वितळू लागेल तेव्हा घुसखोरी काश्मीरच्या उत्तरेकडून केली जाते. जेव्हा बर्फ पडायला लागतो तेव्हा अन्य बाजूने घुसखोरी होते असे रावत म्हणाले.