गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अमलीपदार्थ प्रकरणी कळंगुट येथे छापा घालून इबोनीनामक (४० वर्षे) एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्यांच्याकडून ८३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थाची किंमत अंदाजे ५ लाख रुपये एवढी आहे. २१ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी २.३० यावेळेत गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नायजेरीन नागरिक राहत असलेल्या ठिकाणावर छापा घालून त्याला ताब्यात घेतला.
दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पार्से पेडणे येथे एका दारूच्या दुकानाजवळील एका जुगार अड्ड्यावर छापा घालून चार जणांना अटक केली असून त्यांच्याजवळील १२ हजार ८०० रूपये जप्त केले. ही कारवाई २१ सप्टेंबरला मध्यरात्री करण्यात आली. या प्रकरणी इंद्रजीत कवठणकर, विनय पै, जोतिबा उद्रे, सचिन नाईक अशी अटक केलेल्याची नावे असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.