- अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
ऋषिमुनींनी कोपून शाप दिला तर त्याला उःशाप तरी असायचा. देवदेवता कोपल्या तर त्यांना येनकेनप्रकारेण प्रसन्न करता येतं. पण माणूस आणि निसर्ग कोपला तर मात्र मनुष्यजातीचा विनाश अटळ आहे हे निश्चित
मध्यंतरी एकदा भावाकडे पुण्याला ४ दिवस गेले होते. भावाचा नातू असेल तेव्हा ७-८ वर्षांचा. एक दिवस दुपारी जेवण झाल्यावर तो जो एका खोलीत जाऊन बसला, बराच वेळ बाहेरच आला नाही. मी विचारल्यावर कळलं की त्याच्या आईवर रागावून तो त्या खोलीत जाऊन बसला होता. ती खोली म्हणजे त्याचं ‘कोप भवन’ आहे म्हणे! तो कधीही कोणावरही रागावला की त्या ‘कोप भवना’त जाऊन बसतो. कोप म्हणजे रागाचा भडका. माणूस कधीही, कोणावरही कोपीष्ट होऊ शकतो. मला पूर्वीच्या ऋषीमुनींची आठवण झाली. पूर्वी ऋषी-मुनी कोपायचे आणि समाधी लावून बसायचे आश्रमात. पण हल्ली अलीकडच्या काळात कोप हा सर्वमान्य झालाय. पूर्वी ऋषी एकदा कोपले की शाप देऊनच मोकळे व्हायचे. पण नशीब आता कोपलेली माणसं शाप वगैरे देत नाहीत. पण शापजन्य परिस्थिती मात्र निर्माण करू शकतात.
पूर्वीच्या ऋषीमुनींच्या वाणीमध्ये इतकी ताकद होती की त्यांनी एकदा शाप दिला की विनाश अटळ होता. तशीच त्यांच्या उःशापाच्या शब्दात प्रचंड ताकद होती. या बाबतीत दुर्वास ऋषी आणि जनदग्नी ऋषी अत्यंत कोपीष्ट म्हणून प्रसिद्ध होते. जमदग्नी ऋषींनी तर कोपाच्या भरात आपल्या पत्नीचे रेणुका मातेचे शीर उडवण्यास आपला मुलगा परशुराम याला सांगितले होते आणि परशुरामानेही पित्याची आज्ञा वंद्य मानून आईचं शिर धडापासून वेगळं केलं. ऋषिमुनींच्या शाप-उःशापाच्या अनेक गोष्टी पुराणकाळात सापडतात. आताच्या काळात असे नमुने पावलापावलावर सापडतात. मग ते घरात असतील, राजकारणात किंवा समाजात असतील. ते एकदा कोपले की कोणाची कितीही वाट लावू शकतात. किंबहुना जीवसुद्धा घेऊ शकतात.
पूर्वीच्या काळी कोणत्याही रोगाची साथ सुरू झाली की लोक देवाचा नाहीतर देवीचा कोप झाला, असं म्हणायचे. ‘मरी आई’ कोपणारी देवी म्हणून प्रसिद्ध होती. औषधोपचाराने रोग बरा होतो ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे औषधोपचार करण्याच्या आधी देवीचा कोप कसा नाहीसा होईल हा विचार करायचे. मग त्यासाठी कोणी म्हणायचे कोंबडा कापून देवाला नैवेद्य दाखवा. कोणी म्हणायचे बकरा कापा, इतकंच नव्हे तर नरबळी देऊनसुद्धा देवाचा कोप दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा, आणि एकदा का देवाचा कोप दूर झाला की सगळी रोगराई जाईल, अशी त्यांची श्रद्धा होती. विशेषतः आदिवासी वस्त्यांवर आणि दुर्गम भागांमध्ये हे जास्त व्हायचे. अजूनही काही गावातून या प्रथा प्रचलीत आहेत. पूर्वी विज्ञानानं इतकी प्रगती केलेली नव्हती. इतक्या प्रकारची प्रत्येक रोगावर औषधंही नव्हती. डॉक्टरकडे ताबडतोब पोहोचण्याइतपत वाहतुकीची साधनंही नव्हती. शिक्षणाचा अभावच होता. कुपोषण होतं. स्वच्छतेच्या कल्पना फार चांगल्या नव्हत्याच. दारिद्य्रतर पाचवीलाच पुजलेलं. अशा परिस्थितीत देवाच्या कोपावर किंवा प्रसन्नतेवर अवलंबून राहण्याशिवाय पर्यायच नव्हता.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा हा आदिवासी भाग आहे. काही रोगराई आली, मूल दगावले, बाळंतपणात एखाद्या स्त्रीला मृत्यू आला की लोक म्हणायचे देवीचा कोप झाला. डॉक्टरकडे जायला लोक धजावत नव्हते. त्यामुळे रोगाच्या साथीत असंख्य बळी जायचें. अर्भक-मृत्युंचे प्रमाणही वाढतच गेले. पण वैद्यकीय शास्त्र खूप पुढे गेलंय. सगळ्या रोगांवर औषधं निघालीयत. ती घ्या, रोग बरा होईल हे सांगून कळण्याइतकं ज्ञान या लोकांना नव्हतं. तेव्हा डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांनी या लोकांच्या श्रद्धेला तडा जाऊ न देता या कोपावरच एक तोडगा काढला. त्यांनी लोकांना पटवलं की देवी सांगेल ते ऐकलंत तर देवीचा कोप होणार नाही. त्यासाठी त्यांनी आदिवासींची देवी मॉं दंतेश्वरी हिचं देऊळच आपल्या दवाखान्याच्या गेटजवळ बांधलं. लोकांना सांगितलं की आधी देवीचा आशीर्वाद घ्या आणि मग औषध घ्या. देवीनं तसे संकेत दिले आहेत. देवी दंतेश्वरीचा संकेत म्हटल्याबरोबर लोकांना ते पटलं. लोक औषधोपचार करून घेऊ लागले. रोगराई नाहीशी होऊ लागली. लोकांची समजूत – देवीचा कोप दूर झाला.
हल्ली निसर्गही कोपतो बरेच वेळा. आपण निसर्गाचे नियम तोडले की निसर्ग कोपणारच ना! बघा, निसर्गावर आपण वाजवीपेक्षा जास्त भार घालतोय. माणसानं लोकसंख्या इतकी वाढवली, इतकी वाढवली की त्यांना घरं, जमीन, अन्नधान्य, पाणी, रोजगार सगळंच कमी पडू लागलं. लोकसंख्या वाढवताना ना स्वतःच्या आर्थिक, शारीरिक कुवतीचा विचार केला ना या निसर्गाकडून मिळणार्या वस्तूंचा विचार केला. राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. मग पाणथळ जागी, समुद्रात भर घालून कॉंक्रिटची जंगलं उभी केली. समुद्रात कचर्याचे ढीग जमू लागले. त्सुनामीसारखी भयंकर वादळे, भुकंप होतात. गावंगावं नाहीशी होतात. बळींची संख्या वाढत राहते. डोंगर कापले, झाडे कापली. धरती उजाड झाली. त्यामुळे पाऊस कोपला. आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तेव्हा, वाटेल तसा, वाटेल तिथे पाऊस कोसळू लागला. कोपीष्ट पावसाने ना ओल्या दुष्काळाचा विचार केला ना कोरड्या दुष्काळाचा! ओल्या दुष्काळानं अन्नधान्य कुजून गेली आणि कोरड्या दुष्काळाने अन्नधान्य करपू लागली. पाण्याविना, अन्नाविना माणसं उपाशी तडफडू लागली. चार्याविना गुरंढोरं तडफडू लागली. हा निसर्गाचा कोपच नव्हे का? निसर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावरचा भार कमी करतोय. पण एवढं करूनही आपण त्याला कुठे दाद देतोय? शेवटी निसर्गाला आपला दंडा (कोप दाखवावाच लागतोय.)
ऋषिमुनींनी कोपून शाप दिला तर त्याला उःशाप तरी असायचा. देवदेवता कोपल्या तर त्यांना येनकेन प्रकारेण प्रसन्न करता येतं. पण माणूस आणि निसर्ग कोपला तर मात्र मनुष्यजातीचा विनाश अटळ आहे हे निश्चित!!