.. सूपातले… हसती!

0
303
  •  सुरेखा सुरेश गावस देसाई
    (धुळेर-म्हापसा)

‘देवादिकांनाही जेथे मरण चुकले नाही, तेथे आम्हा पामरांचा काय पाड!’
तेव्हा मरणाची भीती कशाला? हे मरणा, आज आत्ता आलास तरी चालेल.

स्टाफमधील एक सहकारी. त्याच्या आईचे आकस्मिक अपघाती, अकाली निधन झाले. सर्वांबरोबर मीही जाणार होते त्याच्या घरी पण मनाच्या सांदीकोपर्‍यात थोडी भीती, धाकधूक आणि उत्सुकताही… सगळ्यांनी खळबळ माजविली होती. कारण आजपर्यंत मी कुठल्याच स्मशानभूमीत पाय ठेवला नव्हता.

आज पहिल्यांदाच फ्युनरल प्रोसेशन – शवयात्रेत सामील झाले होते. चर्चमध्ये जाऊन मास – प्रवचन ऐकले. त्यानंतर लगतच्या दफनभूमीकडे सर्वजण निघाले. मीही इतरांचे अनुकरण करत चालले होते. सर्व कसे यंत्रवत् शिस्तबद्ध शांततापूर्ण वातावरणात यथासंाग पार पडत होते. मीही थापीभर माती घेऊन आयताकृती खड्‌ड्यातील शवपेटीकेवर टाकली. नतमस्तक होऊन इतरांबरोबर बाहेरच्या दिशने चालू लागले. प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर मान वर केली.
काय दिसले? प्रवेशद्वाराच्या फाटकाजवळील काळपट, लालसर, जांभ्या दगडाची भिंत – त्यावर पांढर्‍या फेक रंगाने सुबक, सुवाच्य, मोठ्या अक्षरांनी लिहिलेले एक वाक्य – आयज माका, फाल्या तुका- आज मला उद्या तुला! चार शब्दांचे वाक्य. प्रत्येक शब्द दोन वा तीन अक्षरांचा. प्रथम मी दचकलेच ते वाचून आणि नंतर स्तिमितही झाले. कुणा तत्त्ववेत्त्याच्या सुपीक डोक्यातून या सुवचनाची निपज झाली असेल? किती सहजतेने साध्या सुबोध छोट्या वाक्यात जीवनाचे सार ठासून भरले आहे. वाक्य लहान पण त्यातील गर्भितार्थ किती महान! जनन-मरण जणू तोलून धरले आहे या उक्तित!
मृत देहावर माती टाकताना किती जणांच्या मनात हा विचार आला असेल – आज मी यावर माती टाकत्यो, उद्या लोक माझ्याही मृत देहावर अशीच माती टाकतील – जेव्हा तेथे मी चिरशांती घेत पहुडलेला असेन. खरेच शांती लाभेल मला? मुक्ती कोणाला मिळते?
येथे अधूनमधून येणार्‍यांच्या ‘हे’ वाक्य अंगवळणी पडले असेल. त्यामुळे त्यांना ते खटकत नसेलही, पण ‘हे वाक्य’ त्यांना जरूर हटकत असेल.

जवळ जवळ असाच मथितार्थ असलेली म्हण आठवली – जात्यातले रडतात अन् सुपातले जात्याच्या दगडी पाळाखाली चिरडून भरडले जातात. आपल्या अवस्थेकडे सुपातील उरलेले दाणे त्यांना पाहून हसतात. बरे झाले, आपण सुपात आहोत ते! म्हणूनच तर सुखात आहोत. पण त्या हसणार्‍यांना कुठे माहीत असते की लवकरच आपली वर्णी तेथे लागणार, आपणही भरडले जाणार आहोत म्हणून?
हे तत्त्वज्ञान सांगणारा तत्त्वज्ञानी तर महानच. पण त्याहीपुढेे जाऊन मला वाटते – ज्याने कोणी ही उक्ती येथे लिहिण्याची कल्पना मांडली, त्या दूरदर्शी, द्रष्ट्या विचारवंताच्या कृतीला – वृत्तीला सलाम. स्मशानाच्या फाटकाजवळील प्रवेशद्वाराच्या भिंतीवर कोणाच्याही नजरेतून सुटणार नाही, अशा प्रकारे लिहिलेले हे वाक्या! याहून सुयोग्य – उचित जागा या तत्त्वज्ञान स्वरूप सुवचनाला असूच शकत नाही.
हसत हसत फसवून जाणारे, जाळ्यात अडकवणारे हे विधान आहे, असेच क्षणभर वाटले मला. काळ्या ढगाला – जलदाला जशी रुपेरी कड असते, तशीच विनोदाची हलकीशी डूब त्याला दिली आहे की काय, असाही विचार मनात चमकून गेला. ‘माझी झाली, आता तुझी पाळी’, पण तत्काळ हे शब्द अंतर्मुखही करतात.

या आधी हे वाक्य माझ्या कानावर पडले होते, पण ते वेगळ्या संदर्भात. एका तियात्रात मुख्य पात्राच्या तोंडून – जनप्रबोधनपर स्वरुपात.
आयज माका, फाल्या तुका
लोकहो, आज माझ्यावर जी पाळी आली आहे, तशी उद्या तुमच्यावर येऊ शकते. म्हणून सावधान! जे कराल, ते विचारपूर्वक करा. आततायीपणाने रागाच्या भरात कोणतेही कृत्य करू नका. खर्‍या खोट्याची शहानिशा करा. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ.’ स्थळ-काळ-संदर्भ वेगळा. त्यामुळे ते वाक्य गांभीर्याने घेतले नव्हते. पण आज भिंतीवर रेखलेले ते वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले.
काय सूचित करत असेल हे विधान? कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही, हे जाणून संचिताचा साठा साचू द्या, पुण्याई पदरात पाडून घ्या. त्यासाठी परोपकार, दानधर्म आदी पुण्यकर्माला आता तरी आपल्या जीवनात थारा द्या. सन्मार्गावर वाटचाल सुरू करा. दानासाठी धनाचीच आवश्यकता नाही. दानत महत्त्वाची. वचने की दरिद्रता? प्रेमाने जग जिंकता येते. चार गोड शब्द बोला. प्रत्येकाच्या मनात काम-क्रोध-लोभ-मोह-मत्सर हे षड्रिपु – भस्मासूर असतात. प्रत्येकाच्या अंतर्यामी सुर-असुर वास करतात. कोणाला स्वीकारावे, कोणाला धिक्कारावे हे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार ठरवावे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. थोडक्यात माणूस म्हणून वागा, माणूस म्हणून जगा.

मी इतरांशी या उक्तिविषयी बोलले. ‘बायबल’मध्ये याचा उल्लेख असेल का? तर ‘नाही’. कोणी म्हणाले ‘आपण मातीतून आलो आणि मातीतच जाणार’ असे बायबलात म्हटले आहे. हे तर सर्वकालीन, सर्व धर्मीय व सर्वश्रुत तत्त्व आहे. यावरून मला एक मराठी गीत आठवले-
माती सांगे कुंभाराला
कशास मज तुडविशी?
तुझाच आहे शेवट
वेड्या माझ्या पायाशी॥
तसे तर मृत्युपुढे सगळेच मान तुकवितात. जर देह नश्‍वर आहे, जीवन क्षणभुंगर आहे, तर अहंकार का आणि कश्याचा बाळगायचा? सत्ता – मालमत्ता – बुद्धिमता – सुंदरता चिरकाल टिकणारी नाही, मग फुकाचा अहंगंड का?
जात-पात, पंथ-संप्रदाय, धर्म आदी कोणी निर्माण केले? सगळ्या धर्माचे संस्थापक एकच शिकवण देतात – माणसाने माणसावर प्रेम करावे. ज्याच्या जवळ माणुसकी नाही, तो ‘माणूस’ म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. ‘मानवता’ हाच एकमेव धर्म मानणारे साने गुरुजी म्हणतात-
‘‘खरा तो एकचि धर्म| जगाला प्रेम अर्पावे’’
मंदिर, मस्जिद, गिरिजाघर में
बॉंट दिया भगवान को|
धरती बॉंटी, सागर बॉंटा
मत बॉंटो इन्सान को॥
वास्तविक धर्मांध, आपमतलबी माणसांनी आपल्या स्वार्थासाठी फूट पाडली, भेदभाव निर्माण केले. खरे तर मृत्युपुढे उच्च-नीच, सधन-निर्धन, आबाल-वृद्ध, आप-पर इ. दर्जा एकच.
सामान्य माणसे असामान्य ठरतात, ती आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने – ती आभाळाएवढी मोठी होतात.

साता समुद्रापलीकडे जन्माला आलेल्या सेंट तेरेझा, स्पेन ही तिची जन्मभूमी, पण भारताला तिने आपली कर्मभूमी ठरवले-बनवले. प्रवासात भारत पाहिल्यावर गवसलेले सापडल्याचा आनंद तिला झाला. कोलकाता भारतातील एक बेसुमार लोकवसतीचे शहर. तिथली एक बकाल वस्ती. रस्त्याच्या कडेला एक माणूस पडलेला. अंगावर जे अपुरे कपडे होते तेही चिखलाने माखलेले – घाणीने बरबटलेले, महारोगाने अर्धेअधिक शरीर सडलेले; हातापायांची बोटे झडलेली, माश्या घोंघावत होत्या; दुर्गंधी मी म्हणत होती.’ मदर टेरेसाने इतर अनुयायांच्या मदतीने त्याला आश्रमात आणले, त्याच्या जखमा धुतल्या, न्हाऊमाखू घातले, दुसरे स्वच्छ कपडे चढविले. त्याच्या सभोवार बसून सर्वांनी प्रार्थनेला सुरुवात केली. त्याचे सगेसोयरे कोणीतरी असतीलच. पण आता तो मरणासन्न होऊन ‘एकला चलो रे’च्या मार्गावर होता. निदान मृत्युसमयी तरी त्याला समाधान लाभावे, हा मदरचा अट्टहास. त्यापायी हा सारा खटाटोप. किती उदात्त भावना!
त्या साधुची गोष्ट आठवत असेल! अर्घ्य देताना त्यांच्या ओंजळीत एक विंचू येतो. तो साधुमहाराजांना नांगी मारतो. हात झटकल्यावर विंचू पाण्यात पडतो व गटांगळ्या खाऊ लागतो. साधु पुन्हा त्याला आपल्या ओंजळीत घेतात, विंचू पुन्हा डंख मारतो. असा प्रकार ३/४ वेळा घडतो. ते दुरून पाहणारी एक व्यक्ती पुढे येते, ‘‘साधु महाराज, कशाला त्याला वाचविण्याच्या फंदात पडता, तो डंख मारणारच.’’ साधुमहाराजांनी काय उत्तर द्यावे? ‘‘विंचू जर आपला डंख मारण्याचा – डसण्याचा धर्म सोडत नसेल तर मी तरी दुसर्‍याला जीवदान देण्याचा धर्म का म्हणून सोडू?’’
सिध्दार्थाने एक रोगी पाहिला. एक जराजर्जर व्यक्ती पाहिली आणि एक प्रेतयात्रा. प्रजेचे जनंतेचे दु:ख पाहून तो व्यथित झाला. लोकांच्या दु:खावर तोडगा शोधून काढण्यासाठी त्याने सर्वसंगपरित्याग केला. गोंडस गोजिरवाणा राहुल बाळ, तरुण सुंदर पत्नी यशोधरा व राजवैभव लाथाडले, कोणालाही न सांगता तो वनात गेला. बोधिवृक्षाखाली बसला; ध्यानधारणा केली; घोर तपश्‍चर्या केली. चिंतन केले आणि ईप्सित साध्य झाले. त्याला ज्ञान प्राप्त झाले, बोध झाला. सुखाकडे जाणार्‍या मार्गात दया-करुणा-क्षमा, शेवटी शांतीप्राप्ती आहे. जन्म-मृत्यु हे तर सृष्टीचे नियम. हेही ज्ञात झाले. आणि तो संत-महंत; शिक्षक- तत्वज्ञ; भिक्षु-साधू, धार्मिक नेता बनला. पण त्यासाठी त्याने आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले.

सम्राट अशोकाने कलिंग युध्दानंतर प्रचंड नरसंहार पाहिला. रक्ताचे पाट-प्रेतांचा खच – कानठळ्या उठविणारा आक्रोश ऐकला. जेता असूनही आपण पराजित झालो आहोत, असे त्याला वाटू लागले. ह्या भावनेने पश्‍चात्ताप-दग्ध अवस्थेत त्याने प्रतिज्ञा केली. ‘यापुढे कधीही युध्द करणार नाही’. कदाचित प्रेतांच्या खचातून त्याला कोणी आवाज तर दिला नसेल ना? ‘पुढच्या युध्दात तू एक असशील या पे्रतांच्या ढिगार्‍यात’ ‘आयज माका, फाल्या तुका’
त्या युध्दानंतर सम्राट अशोकाने बौध्द धर्माचा स्वीकार केला. अहिंसा परमो धर्म: अशी शिकवण देणारा. बौध्द धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी उर्वरीत आयुष्य वेचले.
जरा मागे वळून पहा. नुकतीच तू ज्याच्या अंगावर माती पसरून त्याला शेवटचा निरोप दिलास. काय म्हणत्योय तो? ‘तुझी पुण्याईची पोतडी खचाखच भरण्यासाठी तातडीने कामाल लाग. एकवेळ अशी येईल जेव्हा तुझा आतला आवाज पुन्हा पुन्हा पुकारेल.
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जीणे गंगौघाचे पाणी ॥
‘देवादिकांनाही जेथे मरण चुकले नाही, तेथे आम्हा पामरांचा काय पाड!’
तेव्हा मरणाची भीती कशाला ? हे मृत्यो, आज आत्ता आलास तरी चालेल.