बुमराहची सातव्या स्थानी झेप

0
108

अँटिगा येथे पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत प्रथमच अव्वल दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. बुमराहने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात पाच बळी मिळवत १६व्या स्थानावरून थेट ७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात ७७४ गुण जमा झाले आहेत. वेस्ट इंडीजचा किमार रोच ( + ३, आठवे स्थान) व हेडिंग्ले कसोटीत ९ बळी घेतलेला ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड (+ ३, बारावे स्थान) यांनी प्रगती साधली आहे. कारकिर्दीतील सर्वाधिक ६७१ गुणांसह ईशांत शर्मा २१व्या स्थानी आहे. केवळ दोन कसोटींचा अनुभव गाठीशी असलेल्या जोफ्रा आर्चर याने (+ ४०) ४३व्या स्थानी झेप घेतली आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०८ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा ८५१ गुणांसह दुसर्‍या आणि जेम्स अँडरसन ८१४ गुणांसह तिसर्‍या नंबरवर आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानेही पुन्हा एकदा टॉप ५मध्ये स्थान मिळवले आहे.

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिलेल्या बेन स्टोक्स याने फलंदाजी विभागात १३ स्थानांची झेप घेत ६९३ गुणांसह थेट तेरावा क्रमांक आपल्या नावे केला आहे. अष्टपैलूंमध्ये त्याने थेट दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. या कसोटीच्या दुसर्‍या डावात त्याने नाबाद १३५ धावांची खेळी करतानाच सामन्यात ४ बळी देखील घेतले होते. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर प्रथम क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली पहिल्या तर स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या आणि केन विल्यमसन तिसर्‍या स्थानी आहे.

कोलंबो कसोटीत एकूण ८६ धावा जमवलेला श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (+ २, सहावे स्थान) व खराब फॉर्म बाजूला सारत झुंजार अर्धशतक ठोकलेला इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट सातव्या स्थानी आहे. न्यूझीलंडला टॉम लेथम (+ ५, आठवे स्थान) व भारताचा अजिंक्य रहाणे (+ १०, अकरावे स्थान) तसेच मधल्या फळीतील खेळाडू हनुमा विहारी (+ ४०, सत्तरावे स्थान) व मार्नस लाबुशेन (+ ४५, सदतीसावे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.