झिंबाब्वेच्या मदतीला बांगलादेश

0
107

>> तिरंगी मालिकेचे केले आयोजन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिंबाब्वेला निलंबित केलेले असताना बांगलादेश क्रिकेट मंडळ त्यांच्या मदतीला धावला आहे. झिंबाब्वेचा समावेश असलेली तिरंगी एकदिवसीय मालिकेचे यजमानपद भूषविण्याची झिंबाब्वेने केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यात ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यानंतर यजमान बांगलादेश, अफगाणिस्तान व झिंबाब्वे यांच्यातील तिरंगी वनडे मालिका खेळविली जाणार आहे. आयसीसीच्या फ्युचर टूर प्रोग्रामनुसार अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशात एक कसोटी तसेच वनडे किंवा टी-ट्वेंटी खेळणार होता.

झिंबाब्वे क्रिकेट मंडळाच्या विनंतीनंतर तिरंगी मालिका निश्‍चित करण्यात आल्याचे बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले. आयसीसीचे निलंबन हे आयसीसीने आयोजित सामने किंवा स्पर्धांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे झिंबाब्वेचा समावेश असलेले सर्व सामन्यांच्या अधिकृततेबद्दल वाद नसल्याचे ते पुढे म्हणाले. यजमान बांगलादेश व झिंबाब्वे यांच्यात १३ सप्टेंबर रोजी मालिकेतील पहिला सामना ढाका येथे होणार आहे. दुसर्‍या दिवशी अफगाणिस्तान व झिंबाब्वे आमनेसामने येतील. १५ रोजी बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यात सामना होईल. उर्वरित तीन सामने १८, २० व २१ रोजी याच क्रमाने चितगाव येथे होणार आहेत. २४ रोजी शेर ए बांगला मैदानावर अंतिम फेरी होईल.