भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेत विंडीजचा ३-० असा धुव्वा उडविल्यानंतर वनडे मालिकेची विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे.
उभय संघांच्या मागील पाच सामन्यांचा विचार केल्यास भारताने तीन विजय व दोन पराभव तर विंडीजने चार पराभव व एक विजय अशी कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शनाच्या आधारे ही आकडेवारी दिसत असली तरी क्रिकेटच्या या प्रकारात भारतीय संघ विंडीजपेक्षा नक्कीच उजवा आहे. परंतु, पाकिस्तानप्रमाणेच विंडीजचा संघ बेभरवशी असल्याने त्यांना कमी लेखणे टीम इंडियाला परवडण्याजोगे नाही. विंडीजच्या ख्रिस गेल याची ही शेवटची मालिका आहे. त्यामुळे दमदार कामगिरी करून निरोपाचा त्याचा इरादा असेल. त्यामुळे भारताला सावध रहावे लागणार आहे. त्याच्यासह इविन लुईस किंवा जॉन कॅम्पबेल डावाची सुरुवात करणार आहे. रॉस्टन चेजच्या रुपात अनुभवी व संयमी खेळाडू मधल्याफळीत तर आघाडी फळीत शेय होप असल्याने विंडीजचा संघ अधिक समतोल भासत आहे.
फटकेबाजीसह एकेरी-दुहेरी धावा घेण्याची क्षमता इतर फलंदाजांच्या तुलनेत या दोघांकडे अधिक आहे. हेटमायर, पूरन, गेल हे फलंदाज आक्रमकेची कास धरणारे असल्याने डाव गडगडल्यास चेजवर अधिक दबाव येऊ शकतो. संघातील एकमेव फिरकीपटू म्हणून चेज भूमिका बजावणे अपेक्षित असून पाच स्पेशलिस्ट जलदगती गोलंदाजासह विंडीज उतरू शकते. दुसरीकडे भारतीय संघाचा विचार केल्यास पाचव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर, केदार जाधव व मनीष पांडे यांच्यात चुरस आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा अष्टपैलूची भूमिका जबावणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेतील तिन्ही सामने खेळलेल्या भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिल्यास खलील अहमद व नवदीप सैनी हे दोेघेही खेळू शकतात. मोहम्मद शमीच्या संघातील पुनरागमनामुळे भारताची गोलंदाजी बळकट होणार आहे. जडेजाच्या समावेशामुळे कुलदीप व चहल यांच्यातील एकाला बाहेर बसावे लागणार आहे.
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, केदार जाधव, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, खलील अहमद व कुलदीप यादव.
विंडीज संभाव्य ः ख्रिस गेल, इविन लुईस, शेय होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रॉस्टन चेज, जेसन होल्डर, किमो पॉल, किमार रोच, ओशेन थॉमस व शेल्डन कॉटरेल.