भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री १० वा.हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. येथील एम्स इस्पितळात त्यांनी अखेरच्या श्वास घेतला त्यावेळी त्यांचे पती व कुटुंबिय तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व भाजप नेते डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच विविध पक्षीय नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आज दुपारी ३ वा. होणार अंत्यसंस्कार
सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज बुधवार दि. ७ रोजी दुपारी ३ वा. अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून अंत्यदर्शनार्थ ठेवले जाणार आहे. नंतर ते दिल्लीतील भाजप मुख्यालयात आणले जाणार आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री ९.३० वा. त्यांना छातीत दुखत असल्यामुळे एम्समध्ये दाखल केले होते. मात्र तेथे उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेरीस तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.
कॉंग्रैसकडून दु:ख व्यक्त
स्वराज यांच्या निधनाबद्दल कॉंग्रेस पक्षाने दुःख व्यक्त केले आहे. स्वराज यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे दुःख होत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. पहिल्या मोदी सरकारात महत्वाचे मंत्रिपद भूषविलेल्या स्वराज यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. दुसर्या मोदी मंत्रिमंडळाच्या शपथ विधीनंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भावनिक पत्र लिहून आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळात पाच वर्षे काम करू दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. अनेक राजकीय निरीक्षकांनी सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या स्पर्धक मानले होते. तथापि त्यांनी राजकीय स्थितीशी जुळवून घेत आपल्या खात्याला योग्य न्याय दिला. कोणीही भारतीय नागरिक विदेशात अचडणीत सापडल्यास मदतीचे आवाहन केल्यास व्यक्तिशः लक्ष घालून संबंधित व्यक्तीला मदत केल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळाली. एखाद्याला व्हिसा मिळवण्यात अचडण उद्भवल्यास त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारला पाठबळ मिळाले.
३७० कलम रद्दचे केले
होते उत्स्फूर्त स्वागत
सोमवारी संसदेत जम्मू-काश्मीर विषयक ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी या क्षणाची आपण आपल्या जीवनात वाट पहात होते अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करणारे ट्विट त्यांनी केले होते.
स्वराज यांच्यावर २०१६ साली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरही त्यांनी परराष्ट्रमंत्रिपदाची भूमिका यशस्वीरित्या निभावली. त्यांच्या पश्चात पती कौशल व कन्या बांसुरी असा परिवार आहे.
‘हाच दिवस पाहण्यास थांबले होते’
संविधानाच्या ३७० व्या कलमाखालील काश्मीरचे विशेषाधिकार काढून घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या निर्णयाचे सुषमा स्वराज यांनी काल मंगळवारी संध्याकाळी ट्वीटरवरून जोरदार स्वागत केले होते. ‘‘धन्यवाद पंतप्रधानजी, आपले हार्दीक अभिनंदन. माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची मी प्रतीक्षा करीत होते’’ असे स्वराज यांनी ट्वीटरवर लिहिले होते. तीच त्यांची शेवटची सार्वजनिक प्रतिक्रिया ठरली. तत्पूर्वी सोमवारी संसदेमध्ये ३७० वे कलम हटवण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी करताच त्यांचेही स्वराज यांनी ट्वीटरवरून अभिनंदन केले होते.
ओजस्वी पर्व संपले : पंतप्रधान
भारतीय राजकारणातील एक ओजस्वी पर्व संपले. आपले आयुष्य जनसेवेला व गरीबांच्या जीवन उत्कर्षासाठी वाहिलेल्या सुषमाजींच्या निधनाने देश दुःखसागरात बुडाला आहे. सुषमाजी ह्या त्यांच्यासारख्या एकमेवाद्वितीय होत्या, ज्या कोट्यवधी जनतेसाठी प्रेरणास्त्रोत होत्या. उत्कृष्ट प्रशासक राहिलेल्या सुषमाजींनी आपण हाताळलेल्या प्रत्येक खात्यामध्ये उच्च मानदंड प्रस्थापित केले. विविध देशांशी भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. मंत्री म्हणून त्यांची मानवीय बाजूही आपण पाहिली आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात संकटात सापडलेल्या भारतीयांच्या मदतीला त्या धावून जायच्या.
देश एका प्रेमळ नेत्यास मुकला ः राष्ट्रपती
देश एका प्रेमळ नेत्यास मुकला अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वराज यांना आदरांजली वाहताना व्यक्त केली. सार्वजनिक जीवनातील त्यांची वचनबद्धता, साहस व प्रतिष्ठा हे गुण प्रकर्षाने पहायला मिळाले.
भाजप, भारतीय राजकारणाची
मोठी हानी : अमित शहा
सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भाजपचे आणि भारतीय राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय व समर्थक यांच्याप्रती मी सर्व भाजप कार्यकर्त्यांतर्फे सहवेदना व्यक्त करतो.
असामान्य राजकीय नेत्या ः राहुल गांधी
स्वराज यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. त्या एक असामान्य राजकीय नेत्या होत्या. त्यांना वक्तृत्वाची दैवी देणगी लाभली होती. एक असामान्य संसदपटूही त्या होत्या. त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
शेवटचे काही क्षण
रात्री ९.३० वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने सुषमा स्वराज यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये आपत्कालीन कक्षात उपचारार्थ नेण्यात आले.
ह्रदयविकाराच्या धक्क्याने स्वराज यांचे निधन झाल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी जाहीर केले.
स्वराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, राजनाथसिंग, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांनी तात्काळ ‘एम्स’ कडे धाव घेतली.