- देवेश कु. कडकडे
एक माणूस दहा माणसांना घेऊन येतो. हे दहाजण शंभर माणसांना घेऊन येतात. इथेच स्थायिक होतात. पुढे नागरिक बनतात, मतदार वाढतात. त्यांची भक्कम मतपेटी बनते. हळूहळू राजकीय ताकद निर्माण होते. यांचा उद्या आमदारही बनेल. भविष्यात गोव्याची भाषिक अस्मिता, गोंयकारपणा, आमचा सामाजिक सलोखा धोक्यात येण्याचा संभव आहे आणि गोवेकर गोव्यातच अल्पसंख्यांक ठरण्याची भीती आहे.
जगात १०० शहरांमध्ये प्रचंड वेगाने स्थलांतर होत आहे. त्यामुळे परप्रांतीयांची लोकसंख्या वाढून स्थानिक अल्पसंख्यांक बनण्याची भीती व्यक्त केली जाते. यातील २५ शहरे ही भारतातील आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता या शहरांत सर्वांत जास्त परप्रांतीय येतात. आपल्या देशात बिहार राज्यातून स्थलांतरित येण्याचे प्रमाण आता वाढत आहे. सध्या गोव्याची लोकसंख्या १५ लाखांवर पोचली असल्याचा अंदाज आहे. यातील साडेचार लाख लोकसंख्या ही परप्रांतीयांची आहे आणि त्यांच्या वाढीचे प्रमाणही लक्षणीय आहे. मूळ गोमंतकीयांंची लोकसंख्या घटत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. उच्चभ्रू हिंदू आणि ख्रिस्ती समाजाचा ओढा विदेशात स्थायिक होण्यामागे असतो. भारतातील धकाधकीचे जीवन, वाढती लोकसंख्या, बेशिस्तपणाचा कहर यामुळे हा समाज विदेशी जीवनशैलीशी जुळवून घेण्यास प्राधान्य देतो. ही मुले विदेशात स्थायिक झाल्यामुळे त्यांचे मातापिता वृद्धापकाळात एकटेपणाचे जीवन जगत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. तर दुसरीकडे परप्रांतीयांची संख्या गोव्यातील सर्व भागांत वेगाने वाढत आहे. वास्को, मडगाव, पणजी, म्हापसा या मोठ्या शहरांत कुठेही नजर टाका, बसमध्ये, रस्त्यावर, बाजारात, गल्लीबोळात सर्वत्र तुम्हाला परप्रांतीय मोठ्या संख्येने वावरताना दिसतील. गोवा मुक्तीनंतर गोव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून परप्रांतीयांचा ओघ सुरू झाला.
आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा यामुळे येथे विकासाला प्रचंड वाव होता. हे लोक हमाली, गवंडीकाम करायचे. स्थानिक लोकांशी जुळवून घेत कधी समाजात उपद्रव न माजवता त्यांनी शांतता बिघडू दिली नाही. पुढे मारवाडी लोकांनी गोव्यात आपले बस्तान मांडले. नेपाळी आणि सुरक्षारक्षक हे समीकरण झाल्याने या लोकांची संख्या वाढू लागली. पुढे केरळीयन, मद्रासी गोव्यात रोजगाराच्या शोधात आले. त्यामुळे यांच्या वाढत्या संख्येबाबत अस्वस्थता होती. तरीही गांभीयार्र्ने कधी चर्चेला तोंड फुटले नाही, कारण हे लोक आपण आणि आपले काम बरे या समजुतीच्या भूमिकेत राहिले. परप्रांतीयांच्या वाढत्या समस्येचा प्रश्न तेव्हा उग्र रूप धारण करून पुढे आला, जेव्हा देशातील उत्तर प्रांतातील लोकांचा लोंढा गोव्यात कामाधंद्यानिमित्त येऊ लागला. जागतिकीकरणामुळे उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळाले. अनेक कंपन्यांनी आपल्या धंद्याचा विस्तार भारतभर करण्यास सुरुवात केली. जमिनीच्या तुकड्यांना सोन्याचे भाव मिळू लागले. फ्लॅट संस्कृतीमुळे इमारती बांधण्यास मजुरांची उणीव भासू लागली. गोव्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारला तसा गोव्यातील युवापिढीचा आता नोकरी मिळवण्याकडे कल वाढू लागला.
हलकी कामे करणे गोमंतकीय टाळू लागला. त्यामुळे शेती-बागायतीची कामे करण्यास परप्रांतीयांची आवश्यकता भासू लागली. हळूहळू गोवेकरांनी धंद्याकडे पाठ फिरवली. गोव्यात अनेक औद्योगिक आस्थापने, दुकाने, गाडे परप्रांतीयांना भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. हे लोक कोणतेही काम करण्याची लाज बाळगत नाहीत, तसेच वेळेवर काम करतात. म्हणून त्यांनी आपली जागा घेतली आहे. परप्रांतीयांची संख्या कमी करायची असेल तर मिळेल ते काम करण्याची हिंमत स्थानिकांनी दाखवायला हवी. बोलणे सोपे आहे, परंतु हे प्रत्यक्षात घडत नाही. कोकण रेल्वेच्या विस्तारामुळे उत्तर भारतातील परप्रांतीयांची गर्दी वाढविण्यास हातभार लागला.
भारताचा उत्तर प्रांत हा मोठा प्रदेश सदैव जातीपातीने भरडलेला, सामाजिक आणि राजकीय संघर्षामुळे मागासलेला आणि दुष्काळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीने पिळलेला. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धेचा पगडा, रोजगारीचा अभाव यामुळे विकासापासून कोसो दूर. त्यामुळे मोठा वर्ग पिढ्यान्पिढ्या दारिद्य्राशी झगडत असतो. विकसनशील राज्यात रोजगाराच्या संधी शोधत हे परप्रांतीय येतात. आज गोवेकरांनी धंदा परवडत नाही म्हणून दुकाने परप्रांतीयांना भाडेपट्टीवर दिलेली आहेत. १५-२० हजार रुपये भाडे देण्यास त्यांना कसे परवडते हा एक संशोधनाचा विषय आहे. आज सर्वत्र चालक, भाजी-मासे विक्रेते, सुरक्षारक्षक, मदतनीस दिसतात ते परप्रांतीयच असतात. हे दुकान, आस्थापने, लॉजिंग, हॉटेलमध्ये काम करतात. घरात बिर्हाड करून राहतात. परंतु या सर्वांची पूर्ण माहिती उपलब्ध नसते. यातील काही लोक गुन्हेगारी करून आपल्या राज्यात पळून जातात. सध्या आपल्या गोव्यात परप्रांतीयांनी आपली नावे बदलण्याचा सिलसिला चालू केला आहे. यादव, सिंग ही आडनावे बदलून ती सावंत, नाईक करून त्याला गोमंतकीय मुलामा देण्यात येतो आणि हा प्रकार राजरोस चालू आहे. येथे स्थानिकांना साधे रेशनकार्ड करण्यास अनेक दिव्यांतून जावे लागते. ही नावे बदलण्यामागील हेतूबद्दल आणि देणार्यांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होणे साहजिक आहे. याचाच अर्थ राजकीय पक्षाचे नेते आणि भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यांना रेशनकार्ड बनवून देतात. त्यांना दारिद्य्ररेषेखालील सर्व सुविधा मिळवून देतात. पुढ हेच लोक त्यांची मोठी मतपेढी बनतात. ९० च्या दशकात अनेक परप्रांतीयांनी सरकारी नोकर्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत.
उत्तर भारतातील जातीपातींमधील संघर्ष, जमीनदारांकडून होणारी खालच्या वर्गाची पिळवणूक तसेच राजकीय पक्ष समाजात फूट पाडून सदैव दंगल घडवतात, भयभीत वातावरण पसरवतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी हे परप्रांतीय एकदा गोव्यात आले की बहुतेक येथेच संसार थाटतात. केवळ वर्षातून एकदा गावात फेरफटका मारतात. येथे त्यांना सुरक्षित वाटते. यातील काही जण इथल्या भूमीशी समरस झालेले आहेत. भारतीय घटना ही सर्वश्रेष्ठ आहे. कोणत्याही नागरिकाला आपण रोखू शकत नाही. आपले गोवेकर देश-विदेशात अनेक ठिकाणी कामाधंद्यानिमित्त वावरत असतात. पोर्तुगाल-ब्रिटन, अमेरिकेत भारतीय वंशजाची व्यक्ती तिथे सत्तेच्या उच्चपदावर काम करतात, तेव्हा आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, परंतु एखादा परप्रांतीय आपल्या भागात नगरसेवक बनला तरी आपली अस्मिता दाखवली जाते.
आपला जळफळाट होतो. आपण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत. या सर्व गोष्टी काही एका दिवसांत घडून येणार्या नसतात. आपण परप्रांतीयांना हाकलून देण्याच्या गोष्टी करतो. आज गोव्यात सर्वत्र मासेमारीचे ट्रॉलर्स हे उत्तर-दक्षिण भारतीय चालवतात. आपले लोक आपली दुकाने परप्रांतीयांना भाड्याने देऊन एक तर सरकारी नोकरी करतात किंवा विदेशात नोकरीला जातात. आपल्या जमिनीही मोठी रक्कम मिळते म्हणून परप्रांतीयांना विकतात. आपले धंदे त्यांच्या स्वाधीन करतो आणि मग डोईजड झाले की, त्यांच्याच नावाने ओरडतो, हा मूर्खपणा आहे. एक माणूस दहा माणसांना घेऊन येतो. हे दहाजण शंभर माणसांना घेऊन येतात. इथेच स्थायिक होतात. पुढे नागरिक बनतात, मतदार वाढतात. त्यांची भक्कम मतपेटी बनते. हळूहळू राजकीय ताकद निर्माण होते. यांचा उद्या आमदारही बनेल. भविष्यात गोव्याची भाषिक अस्मिता, गोंयकारपणा, आमचा सामाजिक सलोखा धोक्यात येण्याचा संभव आहे आणि गोवेकर गोव्यातच अल्पसंख्यांक ठरण्याची भीती आहे. प्रश्न मोठा आहे की, हे रोखण्याची आपल्याकडे धमक आहे की हा वारू असाच सुसाट वेगाने धावणार आहे?