प्रणिथचा उपउपांत्य फेरीत प्रवेश

0
117

सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत, एचएस प्रणॉय यांना काल गुरुवारी थायलंड ओपन वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. पुरुष एकेरीत बी. साई प्रणिथ याने आगेकूच करताना उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमन केलेल्या सायना नेहवालला जपानच्या बिगरमानांकित सायाका ताकाहाशी हिने २१-१६, ११-२१, १४-२१ असे पराजित केले. सायनाच्या पराभवामुळे भारताचे महिला एकेरीतील आव्हान काल आटोपले. पाचव्या मानांकित श्रीकांतने थायलंडच्या खोसित फेतप्रताब याच्याविरुद्ध एका गेमची आघाडी दवडताना २१-११, १६-२१, १२-२१ असा पराभव मान्य केला.

बिगरमानांकित पारुपल्ली कश्यप याचा खेळ तिसर्‍या मानांकित चोव तिएन चेन याच्याविरुद्ध खुलला नाही. त्याला एकतर्फी लढतीत २१-९, २१-१४ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. मागील आठवड्यात जपान ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या साई प्रणिथने आपला शानदार फॉर्म कायम राखताना भारताच्याच शुभंकर डे याचा २१-१८, २१-१९ असा काटा काढला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी अनपेक्षित निकालाची नोंद करताना सहाव्या मानांकित फजर अलफियान व मोहम्मद रियान आर्दियांतो यांना २१-१७, २१-१९ अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पुढील फेरीत त्यांचा सामना पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या चोय सोलगयू व सियो सियोंग जाई या कोरियाच्या जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांना आठव्या मानांकित टांग चून मान व त्से यिंग सुएत जोडीने २१-१६, २१-११ असे हरवून बाहेरचा रस्ता दाखविला. सात्विकने मिश्र दुहेरीत अश्‍विनी पोनप्पासह उतरताना अलफियान इको प्रासेतया व मार्शेला गिश्‍चा इस्लामी या यजमान देशाच्या जोडीला २१-१८, २१-१९ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.