![BS Yeddyurappa as Karnataka CM](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/07/26yeddy.jpg)
>> येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी
कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएस युतीचे कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे कमळ ङ्गुलले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री विराजमान झाले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा हाच भाजपचा चेहरा असेल हेही स्पष्ट झाले होते. मात्र, कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर लगेचच सत्तास्थापनेचा दावा न करता येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. त्यानंतर काल राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला. शपथविधी सोहळ्याला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी कडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
भाजपकडे बहुमताचे संख्याबळ
कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या २२५ आहे. त्यातील एक अपक्ष आणि कॉंग्रेसच्या दोन बंडखोर सदस्यांना विधानसभा सभापती के. आर. रमेश कुमार यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे एकूण सदस्यसंख्या २२२ झाली आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आणखी १४ बंडखोर सदस्यांबाबत अद्याप सभापतींनी निर्णय घेतलेला नाही. सद्यःस्थितीत सभागृहात ११२ हा बहुमताचा आकडा आहे. बंडखोर आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यांच्या गैरहजेरीत २०८ इतके सदस्य उरतील आणि बहुमताचा आकडा १०५ वर येईल. हे गणित भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. भाजपकडे १०५ इतके संख्याबळ असून दोन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. ते पाहता येडियुरप्पा तूर्त बहुमताची परीक्षा पास होतील, हे जवळपास निश्चित आहे.