सर्बियाचा स्टार टेनिसपटू तथा गतविजेत्या नोव्हाक जोकोविचा आणि स्वित्झरलंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर यांच्यात विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामना रविवार दि. १४ जुलै रोजी होणार आहे.
काल झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत चार वेळच्या विम्बल्डन जेत्या ज्योकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बावतिस्टा ऍगुतचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. ज्योकोविचचा हा गेल्या १३ ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील उपांत्य फेरीतील १२वा विजय ठरला. ज्योकोविच आता आपल्या पाचव्या विम्बल्डन जेतेपदापासून एक पाऊल दूर असून त्याचे हे १६वे ग्रँडस्लॅम एकेरी किताब असेल.
ही उपांत्य फेरी होती आणि रॉबर्टो थकला नाही, असे ३२ वर्षीय ज्योकोविच अंतिम फेरीत धडक दिल्यानंतर म्हणाला. रॉबर्टो खरोखरच चांगला खेळला. पहिल्या सेटमध्ये तो काहीसा निराश दिसून आला. परंतु त्यानंतर मात्रा त्याने स्वत:ला स्थिरस्थावर केले आणि चांगला खेळण्यास सुरुवात केली. मी थोडासा गोंधळलो होतो, असे ज्योकोविचने सांगितले.
फेडररची नदालवर मात
दरम्यान, दुसर्या संघर्षपूर्ण उपांत्य लढतीत रॉजर फेडररने स्पेनच्या राफेल नदालवर ७-६, १-६, ६-३, ६-४ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
विजयानंतर बोलताना फेडररने आपण थकलो होतो असे स्पष्ट केले. सामन्याच्या शेवटी बरेच कठीण होते. राफाने सामन्यात राहण्यासाठी काही अविश्वसनीय फटके मारले. त्याचा मी आनंद घेतला. गर्दी आश्चर्यकारक होती. मी खूप चांगली कामगिरी करत होतो आणि कदाचित सामनातील सर्वात मोठे गुण माझ्या बाजूने आले होते, असे फेडरर सांगितले.