आजचे युग ब्रँडिंगचे आहे. स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्याचे आहे, मग ती व्यक्ती असो वा एखादा उद्योग. एकदा का तुमच्या ब्रँडची पुण्याई तयार झाली की मग एका विश्वासाने आपल्याकडे पाहिले जाते. त्याच्या आधारे पुढची मार्गक्रमणा करता येते. ब्रँडिंगच्या या परवलीच्या शब्दाचीच नीट ओळख घडवणारे असेच एक लक्षवेधी पुस्तक म्हणजे ‘ब्रँड आयडेंटिटी ब्रेकथ्रू’. ग्रेगरी डाहल हे ब्रँडिंगमधले एक गुरू. पन्नासहून अधिक देशांमध्ये भटकंती केलेल्या ग्रेगरींनी आयडेंटिटी पब्लिकेशन्स या आपल्या संस्थेतर्फे आजवर अनेक पुस्तके कॉर्पोरेट विश्वासाठी लिहिली. हे पुस्तक मुख्यत्वे ब्रँडिंगविषयी आहे. कोणताही छोटा – मोठा उद्योग वा व्यवसाय असो, त्याची समाजाला, त्याच्या ग्राहकांना नीट ओळख घडवण्यामध्ये त्याचे योग्य ब्रँडिंग मोलाची भूमिका बजावत असते. ब्रँड ही त्याची खरी ओळख असते. त्या उत्पादनाची वा उद्योगाची गुणवत्ता, त्यामागील कार्यसंस्कृती यांची ग्राहकांच्या मनावर छाप उमटवणे, त्यांना प्रभावित करून आकृष्ट करणे हे कोणत्याही यशस्वी ब्रँडचे उद्दिष्ट असते. मुळात ब्रँड म्हणजे काय, स्वतःचे ब्रँडिंग कसे करायचे, त्यातून आपली खरी ओळख समाजाला कशी घडवायची, त्याला प्रभावीत कसे करायचे, त्यातून आपला व्यावसायिक उत्कर्ष कसा साधायचा याचे संगतवार मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
आपला ब्रँड कशासाठी तयार करायचा असतो? अर्थातच ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी. केवळ उत्पादनांच्या किंमती कमी ठेवल्या अथवा महागडी संकेतस्थळे चालवल्याने ग्राहकांचा विश्वास कमावता येत नसतो. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्यांचे साधार विवेचन ग्रेगरी यांनी या पुस्तकामध्ये केले आहे. लोकांना आपल्यामध्ये रस उत्पन्न करणे हे जे ब्रँडिंगमागील प्रमुख उद्दिष्ट असते, ते साध्य करण्याचा एकंदर प्रवास, त्यामधील कर्मचारी, सहयोगी, भागीदार आदींची भूमिका काय राहील हेही त्यांनी विशद केले आहे.
आपला ब्रँड विकसित करताना मुळात आपल्याला आपली नीट ओळख पटणे आवश्यक असते. आपण कोण आहोत? आपली बलस्थाने काय आहेत, आपली वैशिष्ट्ये कोणती आहेत, आपले वेगळेपण काय आहे हे आधी जाणून घेतल्याविना आपण इतरांवर ते ठसवूच शकणार नाही. या प्रोसेस ऑफ डीप सेल्फ रिफ्लेक्शनचे म्हणजेच सखोल स्वप्रतिमा निर्मितीच्या प्रक्रियेचे मनोज्ञ विवेचन ग्रेगरी यांनी या पुस्तकात केले आहे. आपल्या उद्योग वा व्यवसायाची मौल्यवान अशी ओळख घडवणे, त्यासाठी आधी त्याचे खरे मूल्य जाणून घेणे आदी एकेका मुद्द्याचा खल त्यांनी यात केला आहे.
जेव्हा एखादा उद्योग वा व्यवसाय वा उत्पादन आपले विशिष्ट मोल जाणते आणि ते ग्राहकांच्या मनावर ठसवते, तेव्हाच त्याचे वेगळेपण उठून दिसत असते. या प्रक्रियेत नॅरेशनचा म्हणजे कथनशैलीचा वाटा मोठा असतो. ही कथनशैली विकसित कशी करावी आणि त्यातून आपल्या ब्रँडची ओळख ग्राहकांना, समाजाला कशी घडवावी याची दृष्टी ग्रेगरी यांच्या लेखनातून नक्कीच मिळेल. अनेकांना स्वतःचेच मोल ठाऊक नसते, त्याचे ब्रँडिंग कसे करावे हेही कळत नसते, इतरांपेक्षा आपण वेगळे कसे व का आहोत याची जाण नसते. कथनशैली नसल्याने समाजापर्यंत ते पोहोचवताही येत नाही. आपल्या श्रोत्यांसमोर बोलणे (टॉक ऍट) आणि श्रोत्यांशी बोलणे (टॉक विथ) यामध्ये जो महत्त्वपूर्ण फरक असतो तो ग्रेगरी यांनी छान समजावला आहे. आधी आपला ग्राहक कोण आहे, कसा आहे, त्याच्या गरजा काय आहेत, आपले स्पर्धक काय करीत आहेत या सगळ्याविषयी स्पष्टता असल्याखेरीज आपले योग्य ब्रँडिंग करताच येणार नाही. त्यामध्ये क्लॅरिटी(स्पष्टता), अथॉरिटी(अधिकारीपणा) आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऑथेंटेसिटी (सत्यता) असे ग्रेगरी सांगतात. एकूणच आजच्या काळामध्ये परवलीचा शब्द बनलेल्या ब्रँडिंगच्या विश्वाची ओळख घडवणारे ‘ब्रँड आयडेंटिटी ब्रेकथ्रू’ हे एक अतिशय वाचनीय पुस्तक आहे. छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायिकांना ते नक्कीच नवी दृष्टी आणि दिशा देईल.