>> गोसुमंचे वेलिंगकर यांची टीका
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॅसिनोंची पाठराखण करणारे वक्तव्य केल्याने गोवा सुरक्षा मंचने जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅसिनो व्यवसाय व कॅसिनो माफियांना जणू अधिकृत आणि घटनात्मक दर्जा सरकारतर्फे बहाल केला असल्याचा आरोप मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी जारी केलेल्या पत्रकातून केला आहे.
गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅसिनो आवश्यक असून ते हटवता येणार नाहीत, असे जे विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी केले होते. सरकारच्या ह्या निंद्य व संस्कृतीविरोधी घोषणेचा गोवा सुरक्षा मंच तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे वेलिंगकर यांनी पत्रकातून नमूद केले आहे.
कॅसिनोंना गोव्याच्या पर्यटनाचा अविभाज्य भाग कुणी, केव्हा व कुणाला विचारून बनवला याचे उत्तर सावंत यांनी द्यावे, अशी मागणीही वेलिंगकर यांनी ह्या पत्रकातून केली आहे. गोव्याच्या एकूण उत्पन्नाचा किती हिस्सा कॅसिनोतून मिळतो. गोव्यात कॅसिनो नव्हते तेव्हा गोव्यातील जनतेवर उपासमारी करण्याची पाळी आली होती काय, असा खोचक सवालही वेलिंगकर यांनी केला आहे.
कॅसिनोतून सरकारला नगण्य उत्पन्न मिळत असताना कॅसिनो हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याचे भासूवन सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही वेलिंगकर यांनी पत्रकातून केला आहे.