भाजप ५०-६० कोटी रु. देऊन कॉंग्रेसचे आमदार फोडून विकत घेऊ पाहत आहे, असा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर केलेला आरोप निराधार व खोटा असून त्यांच्याकडे काही पुरावा असेल तर तो त्यांनी सादर करावा, असे आव्हान प्रदेश भाजप अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल दिले.
पुढील किमान २५ वर्षे केंद्रात भाजपचेच सरकार असेल. त्यामुळे सर्व राज्यांतील विरोधी पक्षांचे आमदार भाजपमध्ये येऊ पाहत आहेत. त्याला गोवाही अपवाद नसल्याचे तेंडुलकर म्हणाले. गोव्यातील काही कॉंग्रेस आमदारांनी मतदारांच्या बैठका घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांची मते जाणून घेण्याचे सत्रही सुरू केले आहे. मात्र, आम्ही कुठल्याही विरोधी आमदारांच्या संपर्कात नाही. त्यामुळे प्रवेश देण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले.