गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
निवडणूक प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले असून १७ रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे.
येत्या रविवार १९ मे रोजी पणजी मतदारसंघात मतदान घेण्यात येणार आहे. या पोट निवडणुकीत एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी चुरशीची चौरंगी लढत अपेक्षित आहे. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, कॉंग्रेसचे बाबुश मोन्सेर्रात, गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक या प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. घरोघरी प्रचाराबरोबरच काही ठिकाणी कोपरा सभा, बैठका घेतल्या जात आहेत. भाजप, कॉंग्रेस, गोसुमं, आप या प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत. सर्वच उमेदवारांनी मूलभूत सुविधांवर भर दिला आहे.
गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मंगळवारी मतदारसंघात वाहन फेरीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप व कॉंग्रेसकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे.