मेरशी दुहेरी खूनप्रकरणी आरोपींना जन्मठेप

0
212

बाल न्यायालयाने मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणानंतर खून करण्यात आलेल्या नायक दाम्पत्याच्या दोन मुलांचे अपहरण, लैंगिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या ओस्बान लुकस फर्नांडिस (मेरशी) आणि रमेश बागवे (मूळ – मालवण) या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ६.७० लाख रुपये दंडाची शिक्षा काल ठोठावली.

पणजी येथील बाल न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला. ३० एप्रिलला आरोपींना दोषी जाहीर केले होते. शिवाजी नायक यांचा मे २०१३ मध्ये खून करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नीचा खून करण्यात आला. तसेच दोन मुलांचे अपहरण करून त्यांचा लैंगिक छळ आणि खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या दोघा मुलांना अनमोड घाटात निर्जन स्थळी फेकण्यात आले होते. परंतु, सुदैवाने दोन्ही मुले वाचली आणि नायक दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाला वाचा फुटली होती. हा प्रकार १४ मे २०१३ रोजी उघडकीस आला होता.

न्यायालयाने मुलांच्या आईचा खून केल्याप्रकरणी भा. दं. स.च्या ३०२ कलमाखाली संशयितांना जन्मठेप आणि १ लाख रूपये दंड, ३०७ कलमाखाली मुलांचा खुनाचा प्रयत्न प्रकरणी जन्मठेप आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. पॉस्को कायद्याखाली जन्मठेप आणि २ लाख रुपयांचा दंड, गोवा बाल कायद्याच्या कलम ८ (२) खाली ३ वर्षे कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ३६४ कलमाखाली जन्मठेप आणि १ लाख दंड, ३५४ (बी) कलमाखाली ७ वर्षे कारावास आणि २५ हजार रुपये दंड, ३५४ कलमाखाली ५ वर्षे कारावास आणि २० हजार रुपये दंड, कलम २० खाली ७ वर्षे कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
मेरशी येथे शिवाजी नायक हा मजूर राहत होता. कंत्राटदार ओस्बान फर्नांडिस याच्याकडे तो कामाला होता. काही कारणास्तव शिवाजी याला खांबाला बांधून जबर मारहाण करण्यात आली. त्यात शिवाजी नायक याचा मृत्यू झाला होता. संशयित ओस्बान याने मेरशी येथे पोकलीनच्या साहाय्याने एक खड्डा खोदून तेथे शिवाजीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मृत शिवाजी याची पत्नी सुजाता नवरा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यासाठी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर गेली होती. शिवाजी याच्या खुनाची त्याची पत्नी व मुले वाच्यता करतील या भीतीमुळे संशयितांना त्यांना त्यांच्या मूळ गावी पोचविण्याच्या निमित्ताने१३ मे रोजी अनमोड घाटात नेऊन त्याठिकाणी शिवाजी याची पत्नी सुजाता हिचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिला. त्यानंतर शिवाजी यांच्या लहान मुलांचा गळा आवळून त्यांनाही दरीत फेकून दिले. सुदैवाने दरीत फेकलेली मुलगी वाचली आणि मुख्य रस्त्यावर आल्यानंतर एका वाटसरूच्या मदतीने कुळे पोलीस स्टेशन गाठले. कुळे पोलिसांनी या प्रकरणी तपास करून बाल न्यायालयात आरोपपत्रदाखल केले.