माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कार्यकाळात झालेले गैरव्यवहार उघडकीस आणणार आहे, असे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल जाहीर केले.
ढवळीकर यांच्या कार्यकाळातील विकास कामांतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी आल्या असून या तक्रारीची चौकशी करून जून महिन्यात अधिकृत बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे, असेही पाऊसकर यांनी सांगितले.
बांधकाम खात्याच्या अनेक प्रकल्पांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही प्रलंबित कामे २०१९ पर्यत पूर्ण केली जाणार आहेत. मडकईतील कामांच्या आठ तक्रारी आलेल्या आहेत. या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाणार आहे. ढवळीकर यांनी १८ वर्षे या खात्याचा कार्यभार सांभाळता. परंतु, अनेक रस्ते, पाण्याची कामे अपूर्णावस्थेत आहेत. पाण्याच्या पुरवठ्याबाबत चौकशी केली जाणार आहे, असेही पाऊसकर यांनी सांगितले.
पत्रादेवी ते पणजी व इतर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे मार्गी लावण्यासाठी २०२० पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत आहे. दुचाकी व इतर वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून खड्डे बुजविण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.